वजन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला आपली बाह्य आकृती सुडौल व मापात असावी असे वाटत असते व प्रत्येक व्यक्ती आप - आपल्या परीने तसा प्रयत्न देखील करत असतात. मात्र वजन हा असा विषय आहे की त्याचा निर्देश अंक हा वाढतच असतो व तो नियंत्रणात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
लठ्ठपणा, स्थुलता किंवा वजन ही आपल्या शरीराची अवस्था आहे व आपण ती सहज नियंत्रणात आणु शकतो. किंवा कुठल्याही अवैद्यकीय सल्ल्या वरुन आपण वजन कमी करु शकतो असा ठाम विश्वास लोकांमध्ये असतो. काही प्रमाणात लोकं त्यात यशस्वी देखील होतात मात्र त्यांना हा वजन कमी करण्याचा प्रकार वारंवार करावा लागतो. त्यातच सोशल मीडिया, टि. व्ही., वर्तमान पत्र किंवा मासिकां मधील मोठ- मोठ्या जाहिरातीला बरेच लोक आकर्षित होतात व वजन वाढण्याच्या मुळ कारणां कडे दुर्लक्ष करून आजार कमी करण्या पेक्षा वजन कमी करण्याच्या मागे लागतात.
वजन कमी करण्याच्या कुठल्याही पद्धतीचा स्वीकार करण्यापूर्वी सर्व प्रथम प्रत्येक वजनदार व्यक्तिने आपले वजन हा आजार आहे का? हे जाणूनघेणे गरजेचे असते तसेच वजन वाढण्यामागचे शास्त्रीय कारण, त्याची मीमांसा करून, त्याचे निदान व तपासण्या करून, त्या मागील कारणे शोधून, त्या कारणांची चिकित्सा करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे प्रत्येक स्थुल व्यक्तीला लागणारा आहार व व्यायाम हा वेगळा असतो व त्याप्रमाणे तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याप्रमाणे तो अवलंबवयाचा असतो. या सर्व बाबींचा एकच अर्थ असा होतो की जास्तीचे वजन किंवा स्थूलता ही नुसती शरीराची अवस्था नसून तो एक स्वतंत्र आजार आहे व आजार असल्याकारणाने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच त्याचे निराकारण करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थूलता काय आहे? त्यात काय व कोणत्या विकृती होतात? कुठले संप्रेरक ( Hormones ) व Enzymes बिघडतात, कुठल्या पेशींवर कसा परिणाम होतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. ही माहिती जर घेतली तर भल्या मोठ्या जाहिराती मागील भंपकपणा कळतो व आपण अशा गोष्टींमध्ये फसत नाही.
मुळात स्थूलता किंवा लठ्ठपणाला स्वतंत्र आजाराचा दर्जा आधुनिक वैद्यकशास्त्रात खूप उशिरा देण्यात आला व त्यामुळे स्थूलता या आजाराचे निदान व चिकित्सा करणारे फार जास्त डॉक्टर समाजात दिसून येत नाहीत. याच गोष्टींचा फायदा घेत स्थूलता किंवा वजन कमी करण्याचे अवैज्ञानिक सल्ले बऱ्याच सलून, पार्लर,जीम्स किंवा तत्सम व्यवसाय करणाऱ्यां मंडळीं कडून देण्यात येऊ लागले व समाजाने पण सुरुवातीला ते स्वीकारले.आयुर्वेदाने स्थूलता किंवा जास्तीच्या वजनाला एक वेगळा आजाराचा दर्जा दिला असून त्याची कारणे त्यात होणार्या विकृती, लक्षणे, आहार व चिकित्सा यांचा अत्यंत शास्त्रीय पद्धतीने ऊहापोह केला आहे.या सर्व बाबींची नोंद जर समाजाने व वैद्यकशास्त्राने अगोदरच घेतली असती तर स्थुलतेतील घोडेबाजार कधीच फोफावला नसता. आपण बघतो की, चय -अपचयत्मक व्याधी जसे की रक्तातील स्नेह वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे, रक्तदाब वाढणे, थायराइड यासारख्या व्याधींचे निराकरण करण्यासाठी आपण वैद्यकीय सल्ला घेऊन चिकित्सा करून घेतो.मग स्थुलतेच्या बाबतीतच असे का व काय होते की आम्ही अवैद्यक सल्यान वर जास्त विश्वास ठेवून वजन कमी करण्याच्या मागे लागतो. याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक तर तज्ञ व्यक्तींचा अभाव व शास्त्रीय माहिती चा अभाव व दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे खुष्कीच्या मार्गाने आहार, व्यायाम व नियमांचे पालन करण्याची तीव्र अनिच्छा व भराभर वजन कमी करण्याची खूप इच्छा अशा या मानसिकतेमुळे बहुतांश लोक चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात व फसतात.
त्यासाठी स्थूलता काय आहे हे समजावून घेऊ स्थूलता हा एक संप्रेरकाचा लिस्ट आजार असून यात कुठलेही एक संप्रेरक विकृत होत नाही तर खूप सारे संप्रेरक एकाच वेळी विकृत होतात. खरं बघितल्यास एका संप्रेरकाचा दुसऱ्या सोबत खूप जवळचा संबंध असतो व ते एकमेकांना प्राकृत स्थितीत राहण्यास मदत करतात. (Homeostasis)
अशी बरीच संप्रेरक एकाच वेळी कधी या संप्रेरकांचे स्त्राव व स्त्रवण्याचे प्रमाण कमी-अधिक होते तर काहीवेळा ज्या पेशींवर त्यांचे कार्य होणे अपेक्षित आहे त्या पेशी त्या संप्रेरकाचे ग्रहण (reception) व्यवस्थित करत नाहीत. यालाच (resistance) असे म्हणतात.
स्थुलतेचे मध्ये insulin नावाच्या संप्रेरकावर विशेषत्वाने परिणाम होतो. Insulin स्वादुपिंडाच्या बीटा पेशींपासून स्त्रवते व त्याचे कार्यमांसपेशी, यकृत, मस्तिष्क, रक्तवाहिन्या, स्त्रीबीज, व हृदयावर प्रामुख्याने दिसून येते. Insulin चे ग्रहण वरील वर्णन केलेल्या अवयवांनी व्यवस्थित नाही केले, विशेषत्वाचे मांस पेशींवर त्याचे ग्रहण व्यवस्थित नाही झाले तर वजन वाढण्यास सुरुवात होते. Insulin सोबतच leptin, Ghrelin, entrostatin, cholicystokinin, lgf व अन्य इतर संप्रेरक सुद्धा विकृत होतात मेदाच्या पेशींपासून adiponectin हे अतिमहत्वाचे संप्रेरक विकृत होते व परिणामी पेशींवर सूज येण्यास सुरुवात होते यालाच शास्त्रीय भाषेत शोथ किंवा inflammation असे म्हणतात या परिणामी भुके वर नियंत्रण न राहणे, सारखी सारखी भूक लागणे खूप जास्त व वारंवार खाणे, सुस्ती,अक्रियाशीलता, खूप तहान लागणे, खूप दम लागणे, जास्तीचा घाम येणे अशी अनेक लक्षणे निर्माण होतात या सर्वांचा परिणाम म्हणून वजन तर वाढतेच पण शरीरातील अवयवांमध्ये पण चरबी जमा होते यामुळे इतर अनुषंगिक आजार निर्माण होतात.आपल्या शरीरातील नक्की कोणते संप्रेरक बिघडली आहेत, वजनाचा कुठला परिणाम शरीरावर झाला आहे त्याप्रमाणे त्याची चिकित्सा व आहार ठरत असतो.
बऱ्याच कुटुंबांमध्ये वजन किंवा स्थूलता नियंत्रणात आणणे हेच मुळात पटत नाही. फक्त खूप व्यायाम किंवा थोडे आहारावर नियंत्रण केल्याने पुरेसे असते व औषधी घेणे हे व वैद्यकीय सल्ला घेणे उपयोगाचे नाही असा खूप मोठा गैरसमज समाजात रूढ आहे. त्यापेक्षा लोकांना खुष्की चे उपाय बरे वाटतात.
स्थूलतेतील वरील किचकट विकृती बघता अशा अर्धवट व अशास्त्रीय उपायांना लोक का व कसे बळी पडतात याचे नवल वाटते.
स्थूलतेतील आहार नियंत्रण हा मोठा कुतुहलाचा व चर्चेचा विषय आहे. खूप जाहिरातींमध्ये विनासायास वजन कमी या मथळ्याखाली लोकांची भूल केली जाते. वास्तविक बघता योग्य व नियंत्रित आहार व योग्य दिनचर्या याशिवाय स्थूलता कमी करण्यासाठी दुसरा पर्याय नाही. बाकी औषधी चिकित्सा ही त्या- त्या विकृतीवर कार्य करते. सर्वात महत्त्वाचा आहारच व हेच आहारावरील नियंत्रण लोकांना नको असते. आज कालच्या 'खाऊ' जगात तसेही आहारावरील नियंत्रण थोडे अवघड जाते. आहाराचा सल्ला देताना प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे आहार नियंत्रण किती दिवस? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एकदा व्यक्ती स्थूल झाला की त्याने आहार नियंत्रण आयुष्यभर करायचे असते. व्यक्ती स्थूल होत असताना त्या व्यक्तीच्या आतड्यातील जिवाणूंचा समूह बदलतो.त्याला Gut flora म्हणतात, हा बदललेला Gut flora पूर्ववत येण्यासाठी साधारण एक ते दीड वर्ष लागते. म्हणजे आहार नियंत्रण सुरू केल्यावर किमान एक ते दीड वर्ष ते सातत्याने करावे लागते. असे केल्यास आपणास अपेक्षित बदल दिसून येईल. म्हणजे आपणास स्थूलता व वजन हे दोन्ही नियंत्रणात आणायचे असतील तर आहार, दिनचर्या व औषधी या त्रिसूत्रीचा योग्य वापर करून घेणे गरजेचे असते. वरील चर्चेवरून एक गोष्ट लक्षात येते की, स्थूलता हा व्याधी अत्यंत किचकट व गुंतागुंतीचा असून या व्याधीचे निराकरण योग्य औषधी, योग्य आहार व दिनचर्या हे सर्व तज्ज्ञ व्यक्तींकडून करून घेणे गरजेचे आहे असे असताना मोठ-मोठ्या जाहिरातींवरून किंवा काही यंत्रे वापरून हा आजार कसा नियंत्रणात येऊ शकतो? हा मोठा प्रश्न आहे. दूरदर्शन वर खूप लांब व प्रभावी वजन कमी करायच्या जाहिराती असतात त्यात पोटावरील चरबी कमी करायचे पट्टे, पोट कमी करण्याचे यंत्र, अशा एक ना अनेक वस्तू विक्रीला असतात ज्या लोकांना स्थूलता वजन याबद्दल योग्य व शास्त्रीय माहिती नाही ते या आकर्षक जाहिरातींवर भुलतात व नंतर त्यांना योग्य तो फायदा होत नाही.बऱ्याच जाहिराती या विशिष्ट प्रकारचे capsules, चूर्ण व व्यायामाच्या मशीन्स च्या असतात. Fruit shakes कॅफिन युक्त शेक्स प्रथिनांच्या Protein पावडर अशा अनेक उत्पादनांची बाजारात रेलचेल असते अशी उत्पादने तज्ञांकडून पुरस्कृत ही असू शकतात अशा उत्पादकांचा उपयोग आपणासाठी योग्य आहे काय याची सर्व माहिती घेऊनच वापर करावा वजन कमी करत असताना किंवा स्थूलता निवारण करत असताना आपल्या शरीरात कुठल्या विकृतीवर ही चिकित्सा पद्धत कार्य करते याची माहिती व खात्री करूनच कुठलेही उत्पादन वापरावे. बरेच वेळा विविध प्रकारच्या Fad diet चा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती व स्थूल व्यक्तींमधील विकृती ही भिन्न असते. त्यामुळे एकाच प्रकारचा आहार एखाद्याला लागू झाला तर तो दुसऱ्याला होईलच असे नाही. स्थूलते सोबत असलेल्या अनुषंगिक आजाराचा विचार करून प्रत्येक व्यक्तिपरत्वे आहाराचा सल्ला द्यायचा असतो. बऱ्याच स्थूल व्यक्तींना वजना सोबतच मधुमेह, रक्तदाब, पी सी ओ डी, गुडघेदुखी असे वेगवेगळे व्याधी असतात अशा वेळेस प्रत्येका लागणारी औषध व्यवस्था किंवा आहारीय व्यवस्था Diet Management भिन्न असते.
स्थूल व्यक्तीं ज्यावेळी आहार नियंत्रण करून वजन कमी करतात त्यावेळी त्यांचा अग्नी, व्याधीची तीव्रता, त्यांच्या दिवसभराच्या कामाची पद्धत, दिनचर्या,ते घेत असलेले औषधी, त्यांची प्रकृती अशा अनेक बाबींचा विचार करून आहार घ्यावा लागतो. उपाशी राहून किंवा Mob Psychology प्रेरित आहाराने स्थूलता हा व्याधी नियंत्रणात येत नाही आपण वजन कमी करताना एखाद्या गोष्टीचे आपण का अनुकरण करतो याची शास्त्रीय माहिती प्रत्येक वजन कमी करणाऱ्या व्यक्तीला असल्यास खूप चांगल्या प्रकारे तो आहार नियंत्रण करतो व त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो.
वजनदार किंवा स्थूल व्यक्तींनी वजन कमी करताना किंवा स्थूलता नियंत्रणात आणताना तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानेच ते करावे.
वजन कमी करतांना आपल्या स्थुलतेचे निदान व्यवस्थित करून घ्यावे. आहार नियंत्रण व योग्य दिनचर्या याचे अवलंब करण्याची सर्वप्रथम मनाची पूर्ण तयारी हवी. वजन कमी करणे व परत वाढवणे असे करण्यापेक्षा वजन कमी न करणे अधिक बरे. वजन कमी करताना त्याची खूप जास्त चर्चा करू नये मागे खेचणारे बरेच असतात वजन किती कमी करावे हे आपल्या मनानेच ठरवण्यापेक्षा तज्ञांचा सल्ला प्रमाणे करावे मी वजन कमी करत आहे याचे नेमके कारण आपल्या मनाला माहिती पाहिजे आमच्या घरी लग्न आहे मला पाच - सात किलो वजन कमी करायचे नंतर वाढले तर चालेल अशांनी वजन कमी करूच नये कारण याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्या मांस पेशी व यकृतावर होतो.वजन कमी करतांना आपल्या सोबतीचे कुटुंबीय मित्र मैत्रीण असे असावे जे आपणास या कार्यात मदत करतील. अडथळे आणणाऱ्या लोकांपासून दूर रहावे. वजन कमी करताना एक तज्ञ जबाबदार व्यक्ती तुमच्या मागे असावा, जेणेकरून तुम्ही तुम्हाला येणाऱ्या अडचणी व तुम्हाला असणाऱ्या शंकाचे समाधान करून घेऊ शकाल.
भडक स्वरूपाच्या जाहिराती, Over claim असणाऱ्या जाहिराती पूरक आहाराच्या उत्पादनाच्या जाहिराती किंवा Fad diets च्या जाहिराती अशा बऱ्याच जाहिराती असतात ज्या खूप मोठे दावे करतात. उदा. तुम्ही काहीही खा व वजन कमी करा, तुमचे वजन परत कधीही वाढणार नाही, तुमचे विशिष्ट भागातीलच वजन कमी होईल ( Spot reduction ) अशा बऱ्याच जाहिरातींना लोक बळी पडतात.
बऱ्याच वेळा वेगवेगळे यंत्रे वापरून चरबी विरघळून वजन कमी करण्याचा दावा केला जातो. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे की चरबी कधीही वितळली जात नाही ती पचवावी लागते. त्यामुळे यंत्राच्या साह्याने वजन कमी करत असाल तर त्याने तुमचा स्थूलता हा आजार कधीही नियंत्रणात येणार नाही. अशा जाहिरातींना भुलून न जाता ज्या पद्धती या शास्त्रीय आहेत, ज्या चिकित्सा पद्धतींना एक पाया आहे, ज्या काळाच्या कसोटीत तपासल्या गेल्या आहे, ज्यामागे अनुभवी तज्ञ व्यक्ती आहेत अशाच पद्धतीचा अवलंब करावा.
स्थूल व्यक्तींनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी वजन किंवा स्थूलता हा आजार कायमस्वरूपी बरा होणारा आजार नाही त्याला सातत्याने नियंत्रणात ठेवावे लागते. वजन कमी करण्यासाठी कुठलीही शॉर्टकट नाही व शल्यचिकित्सा त्यावरचे पूर्ण स्वरूपी उत्तर नाही. त्यामुळे जे सातत्याने आपला आहार व दिनचर्या नियंत्रणात ठेवतील त्यांना मात्र या व्याधींपासून कुठलाही त्रास संभवत नाही.
डॉ.मुकुंद सबनीस
B A M S MD
FOUNDER PRESIDENT
Jeevanrekha Ayurved Chikitsalaya & Research Center.