WhatsApp

आयुर्वेद - विज्ञान की छद्मविज्ञान

January 01, 2026
Share:

"आयुर्वेद हे हजारो वर्षांपासून प्रचलित भारतीय वैद्यकशास्त्र आहे. हे केवळ वैद्यकशास्त्र नसून ती एक जीवनशैली आहे असे म्हटले जाते. पण ही जीवनशैली आजच्या शहरी जीवनात उपयोगी आहे काय किंवा तिचे पालन करता येईल काय असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण होत असतो."

आयुर्वेद हे हजारो वर्षांपासून प्रचलित भारतीय वैद्यकशास्त्र आहे. हे केवळ वैद्यकशास्त्र नसून ती एक जीवनशैली आहे असे म्हटले जाते. पण ही जीवनशैली आजच्या शहरी जीवनात उपयोगी आहे काय किंवा तिचे पालन करता येईल काय असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण होत असतो. सकृतदर्शनी हा प्रश्न गैरलागू नाही. कारण आयुर्वेद प्राचीन शास्त्र असल्यामुळे त्यात वर्णित जीवनशैली त्याचं प्राचीन समाज जीवनास समयोचित असेल, आजचे समाज जीवन पूर्णतः बदललेले आहे.

विद्युत ऊर्जेने आज रात्रीचा दिवस झाल्यामुळे आजचे दिवस रात्रीचे वेळापत्रकच पूर्णपणे बदलले आहे. अशा बदललेल्या वेळापत्रकाच्या गणितात समाज मनात आयुर्वेद जीवनशैली बसण्यासारखी नाही म्हणून ती आचरणयोग्य नाही, असे वाटणे साहजिकच आहे. परंतु वास्तवात आयुर्वेदाच्या जीवनशैलीवरील दिनचर्येचे वेळापत्रक कालानुरूप स्वरूप धारण करू शकणारे आहे. पण त्यासाठी या जीवनशैलीतील निरोगी आयुष्याचे सूत्र समजणे आवश्यक आहे. हेच सूत्र समजावण्याचा प्रयत्न या लेखमालेतून करण्यात येणार आहे...

विकिपीडियावर आयुर्वेदाची छद्मविज्ञान (स्युडोसायन्स) अशी नकारात्मक ओळख करून दिलेली आढळते. विकिपीडियावरील माहितीला वैज्ञानिकांमध्ये विश्वासार्ह मानले जात नसले, तरी जगभरातील बुद्धिमंतांच्या जगात विकिपीडिया हे कोणत्याही विषयासंबंधीचे ज्ञान त्वरित व सहजपणे मिळवण्याचे लोकप्रिय साधन आहे. आयुर्वेदाची ही नकारात्मक ओळख पुसून टाकायची असेल तर त्यासाठी एक विज्ञानाधिष्ठित वैद्यकशास्त्र म्हणून वैज्ञानिक जगतामध्ये आणि जनमानसांमध्ये आयुर्वेदाची प्रतिष्ठापना करणे अत्यावश्यक झाले आहे.

त्यासाठी आयुर्वेद तज्ञांनी एकीकडे त्यांच्या संशोधनातून मिळालेले तथ्याधारित निष्कर्ष संशोधन पत्रांच्या माध्यमातून आणि संशोधन परिषदांमधून वैज्ञानिक जगासमोर सादर करणे, दुसरीकडे लोकप्रिय दैनिके, नियतकालिके, प्रासंगिक प्रसिद्धी पत्रे आणि छोट्या मोठ्या सभा संमेलनातून व आपल्या दैनंदिन व्यवहारातून सामान्यांच्या मनातील आयुर्वेदासंबंधीचे गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. हे दोन्ही उपक्रम सातत्याने करावे लागणार आहेत. तरच दीर्घकाळाने का होईना, त्याचा योग्य परिणाम होण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणून हा लेखन प्रपंच.

जागतिक आरोग्य संघटना देशोदेशींच्या विविध स्थानिक चिकित्सा पद्धतीप्रमाणे आयुर्वेदालाही भारतीय उपखंडात प्रचलित असलेली एक पारंपारिक चिकित्सा पद्धती समजते. संबंधित देशातील संस्कृती, सिद्धान्त, स्थानिक समजुती आणि अनुभव यावर आधारित ज्ञान, कौशल्य व प्रचलित समजुती यांची गोळाबेरीज म्हणजे, त्या देशाची पारंपारिक चिकित्सा पद्धती अशी पारंपारिक चिकित्सा पद्धतीची व्याख्या जागतिक आरोग्य संघटना करते. जगातील बहुसंख्य देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्राचीन चिकित्सा पद्धती प्रचलित होत्या. वास्तविक त्यांना चिकित्सा पद्धती म्हणण्यापेक्षा घरगुती उपचार पद्धती (हीलिंग प्रॅक्टीसेस) असे संबोधणे सयुक्तिक ठरले. आयुर्वेद, चायनीज मेडिसिन आणि युनानी मेडिसिन असे काही अपवाद वगळता अन्य देशातील प्राचीन चिकित्सा पद्धतींना वैज्ञानिक बैठक नाही.

ग्रंथबद्ध व सूत्रबद्ध

जागतिक आरोग्य संघटनेने पाश्चात्यांच्या प्रभावाखाली पारंपारिक चिकित्सा पद्धतीच्या व्याख्येमध्ये समजुती व प्रचलित उपचार यांचा समावेश करून कोणताही वैज्ञानिक आधार नसलेल्या देशोदेशींच्या सर्व प्राचीन घरगुती उपचार पद्धतींना आयुर्वेदासारख्या वैज्ञानिक चिकित्सा पद्धतींच्या समकक्ष प्रस्थापित केले आहे. परिणामी वैज्ञानिक पार्श्वभूमी व आधारांना दुर्लक्षित करून देशोदेशींच्या घरगुती उपचार पद्धती प्रमाणेच आयुर्वेदालाही जागतिक आरोग्य संघटना भारतातील स्थानिक समजुती व चालीरीती यावर आधारित एक घरगुती उपचार पद्धती समजते.

वास्तविक आयुर्वेद ही एक ग्रंथबद्ध व सूत्रबद्ध वैज्ञानिक वैद्यकीय चिकित्सा पद्धती आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने पारंपारिक चिकित्सा पद्धतींच्या गटामध्ये आयुर्वेदच्या केलेल्या समावेशाचा भारताने विरोध करणे आवश्यक होते. हा समावेश भारताने स्वीकारल्यामुळे आयुर्वेद हे वैद्यकशास्त्र न राहता कायमस्वरूपी घरगुती उपचार पद्धती बनून राहिली आहे. आयुर्वेद प्राचीन भारतातील एक लोकमान्य आणि राजमान्य अधिकृत वैद्यकशास्त्र होते. त्यातील अनेक पारिभाषिक शब्द सामान्य जनतेच्या व्यवहारात प्रचलित होते.

आयुर्वेदाच्या मूळ संहिता ग्रंथांमधील कोणतेही सिद्धान्त, वैद्यकीय उपाय योजना, औषधी वा औषधविरहित उपाय योजना समजुती व प्रचलन यावर आधारलेल्या नाहीत. प्रत्येकाला प्रत्यक्ष प्रयोगाचा आधार आहे. जे डोळ्यांनी पाहता येणे शक्य झाले नाही, तेथे तर्काने ती गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे. अर्थात हा तर्कही जे दिसू शकले, त्यावर आधारित आहे. "एतावद् दृश्यं शक्यमपि निर्देष्टुम्। अनिर्देष्यमतः परं तर्क्यमेव च।" जे जे दिसणे शक्य आहे त्याचाच स्पष्ट निर्देश केला आहे. ज्याचा निर्देश केला नाही ते तर्काने जाणून घ्यावे, असे चरक संहितेत चरकाचार्य म्हणतात. पुढे चालून शवविच्छेदनप्रसंगी त्वचेपर्यंत शरीराचे भाग जसे दिसू शकले, तसे त्यांचे वर्णन केले आहे. जे दिसले नाहीत त्यांचे वर्णन तर्कज्ञानाने जाणले असे स्पष्टपणे नमूद केले आहे. जे प्रत्यक्ष दिसते ते आणि जे शास्त्राभ्यासाने प्राप्त होते, ते असे दोन्ही प्रकारचे ज्ञान ज्ञानविवर्धक असते असेही नमूद करून प्रत्यक्ष प्रयोगांचे महत्व अधोरेखित केले आहे.

विज्ञानाधिष्ठित आयुर्वेदावर झाकोळ

भौतिकशास्त्र आणि रसायन शास्त्रामधील अत्यंत पुढाकारलेल्या तंत्रज्ञानाने आज प्राणी शरीरातील सूक्ष्मातिसूक्ष्म भागांचा प्रत्यक्ष आणि सखोल अभ्यास शक्य झाला आहे. या अभ्यासाने प्राप्त ज्ञानामुळे आयुर्वेदातील तर्काधारित काही विधाने आज चुकीचीही ठरत असतील. तसेच आधुनिक संशोधनाने शरीरातील काही क्रिया आज अत्यंत विस्ताराने स्पष्ट झाल्या असतील, पण चुकीच्या ठरणार्‍या काही विधानांवरून व विस्ताराने समजलेल्या शरीर क्रियांवरून संपूर्ण आयुर्वेद अवैज्ञानिक ठरत नाही. तसेच आयुर्वेदोक्त शरीर क्रिया व सिद्धान्त संक्षिप्त वा गृहीतकांवर आधारित असल्यामुळे निरुपयोगी ठरत नाहीत. उलट आज उपलब्ध ज्ञानाचा यथोचित उपयोग केल्यास त्यांची उपयोगिता अधिक सुस्पष्ट होण्यास मदत होत असल्याचे आढळून येत आहे.

येथे उदाहरण म्हणून आयुर्वेदातील त्रिदोष सिद्धान्तांचा ऊहापोह करू या. दोष, धातु, मल व अग्नि या चार शरीर घटकांच्या आधारे शरीरातील विविध रचना व क्रियांचे आयुर्वेदामध्ये स्पष्टीकरण केले जाते. दोष हे विविध शरीरक्रियांचे नियमन करणारे, धातु शरीराची रचना एकत्र सांधून ठेवणारे, मल शरीरातील विविध क्रियेतून निर्माण होणारे निर्गमनशील मलस्वरूप घटक आणि अग्नि शरीरातील पचन व चयापचयादि परिवर्तन घडवणारा घटक होय. या चारही घटकांचे भारतातील प्राचीन धर्मग्रंथ, पुराणे, ललित साहित्य, ग्रामीण साहित्य अशा वैद्यकशास्त्रेतर साहित्यामध्ये ढोबळ उल्लेख विपुल प्रमाणात आढळून येतात.

इतकेच नव्हे तर भारतीय समाजात दैनंदिन व्यवहारांत हे पारिभाषिक शब्द आजही प्रचलित असल्याचे आढळून येते. आयुर्वेद ही तत्कालीन समाजव्यवस्थेतील प्रचलित चिकित्सा पद्धती असल्यामुळे असे घडणे स्वाभाविकच होते. वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा जेव्हा सामान्य जनतेमध्ये रूढ होत असतात तेव्हा संदर्भ बदलल्यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांचे मूळ अर्थही बदलून जात असतात. जोपर्यंत हे शास्त्र समाजात अधिकृतरित्या प्रचलित राहते, तोपर्यंत या संज्ञा त्यांच्या संदर्भासह व मूळ अर्थासह संबंधित शास्त्राच्या अभ्यासकांमध्ये टिकून राहतात. परंतु संबंधित शास्त्राचा व्यवहारातील उपयोग जसा जसा कमी होत जातो, तसे त्याचे अभ्यासक कमी होत जातात आणि परिणामी त्यातील पारिभाषिक संज्ञांचे संदर्भ व मूळ अर्थ लयाला जाऊ लागतात. नंतर उरतात ते फक्त समाजातील त्यांचे बदललेले संदर्भ आणि काही वेळा विपरीत झालेले अर्थ.

वैज्ञानिक अर्थांची वानवा

आयुर्वेदातील वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञांचेही नेमके असेच झाले आहे. ब्रिटिशांच्या भारतातील आगमनाबरोबर आयुर्वेदाची जागा पाश्चात्यांच्या आधुनिक वैद्यकशास्त्राने घेतली आणि वैज्ञानिक आयुर्वेदाचे अभ्यासक कमी कमी होत जवळजवळ नष्टप्राय झाले असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आज प्रचंड संख्येने दिसणारे जे आयुर्वेदाचे पदवीधारक व्यावसायिक आपण पाहत आहोत, ते बहुसंख्येने आयुर्वेदाचा मुखवटा लावून पाश्चात्य वैद्यकाचा व्यवसाय करणारे लोक आहेत. त्यांना आयुर्वेद अभ्यासक म्हणणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेणे होय. त्यामुळेच आज मूळ आयुर्वेद केवळ ग्रंथात उरला आहे. व्यवहारात आज दिसून येतो तो मूळ आयुर्वेद ज्ञानाशी आणि विज्ञानाशी फारकत झालेला समाजात रूढ झालेला आयुर्वेद.

हा आयुर्वेद एकीकडे आजीबाईच्या बटव्यात, परसातील बागेत, अंगणातल्या तुळशी वृंदावनात आणि स्वयंपाक घरातील मसाल्याच्या डब्यात बंदिस्त झाला आहे. तर दुसरीकडे पाश्चात्य वैद्यकाच्या औषधी मिश्रणाने दूषित होऊन स्वतःची ओळख विसरलेला आयुर्वेद बनला आहे. आता तो दैनंदिन वापरातील केश तेल, साबण, दंत मंजने, सौंदर्य प्रसाधने आणि आता पूरक आहार यांच्या वेष्टनातून तथाकथित आयुर्वेदिक औषधी उद्योगाने बाजारांत आणला आहे. हा आयुर्वेद जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपारिक चिकित्सा पद्धतीच्या व्याख्येत बसणारा आहे. हा आयुर्वेद छद्मविज्ञान आहे. या छद्मविज्ञानामागे मूळ विज्ञानाधिष्ठित आयुर्वेद झाकला गेला आहे. आजच्या आयुर्वेदाच्या अभ्यासकांनी, व्यावसायिकांनी तो विज्ञाननिष्ठ आयुर्वेद समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. त्यासाठी पहिले पाऊल म्हणून समाजात प्रचलित आयुर्वेदिक पारिभाषिक संज्ञांचे वैज्ञानिक अर्थ समाजात रूढ करायला हवेत.

या संदर्भात वात, पित्त आणि कफ या तीन दोषांचे उदाहरण घेऊ या. दोष हा शब्द विकृती या अर्थाने जनमानसात परिचित आहे. आयुर्वेदामध्ये हा पारिभाषिक शब्द स्वतः विकृती प्रवण व विकृती निर्माण क्षम शरीर घटक अशा अर्थाने आहे. शरीरातील विविध क्रिया आयुर्वेदाने 1. संवहन वा चालन 2. पचन वा परिवर्तन आणि 3. संश्लेषण आणि स्थिरीकरण या तीन बृहत क्रियागटांमध्ये वर्गीकृत केल्या आहेत. या तीन प्रकारच्या क्रिया पार पाडण्यासाठी तत्संबंधी विशिष्ट गुणधर्म बाळगणाऱ्या शरीर घटकांना अनुक्रमे वात, पित्त व कफ असे संबोधण्यात आले आहे. याच तीन घटकांना त्रिदोष असे संबोधले जाते. विकृत नसताना म्हणजे निरोगी अवस्थेत हे तीन दोष शरीरातील सर्व क्रियांचे सूत्र संचालन व नियमन करीत असतात. पण त्याच वेळी ते अत्यंत विकृतिप्रवणही असतात. विकृत अवस्थेत ते शरीरात रोग निर्माण करण्याची क्षमता बाळगत असतात. म्हणूनच त्यांना निरोगी अवस्थेत ठेवणे हे रोगप्रतिबंधनाचे तर रोगग्रस्तांमध्ये रोगमुक्तीसाठी विकृत झालेल्या दोषांना प्राकृत अवस्थेत पुनस्थापित करणे हेच चिकित्सकाचे उद्दिष्ट असते.

वात, पित्त व कफ हे तीन दोष शरीरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपांत कार्यरत असतात. सामान्यतः ते एकत्रितपणे राहत असतात. प्रत्यक्षात त्यांना परस्परांपासून वेगळे करता येत नाही. त्यामुळे शरीरातील अमुक एक विशिष्ट घटक द्रव्य म्हणजे अमुक एक दोष असे नेमके दाखवता येत नाही. परंतु असे असले म्हणून शरीरातील त्यांचे अस्तित्व नाकारता जाऊ शकत नाही. त्यांच्या भौतिक गुणकर्मांवरून त्यांचे अस्तित्व दृश्यमान होत असते. तर त्यांचे कमी, अधिक वा सम प्रमाण त्यांची निरोगी वा विकृत स्थिती दर्शवत असते. दोषांचे हे सर्व गुणकर्म वैज्ञानिक दृष्ट्या प्रत्यक्ष परीक्षणयोग्य आहेत. योग्य साधन वापरल्यास ते मापनयोग्यही होऊ शकतात. ते कल्पित किंवा छद्मविज्ञानाधारित नाहीत.

दोषानंतर क्रम येतो, तो शरीरातील धातूंचा. धातु हा शब्द जनमानसात इंग्रजीतील मेटल शब्दासाठी वापरला जातो. मेटल्स सामान्यतः एखाद्या वस्तूमध्ये काठिण्य निर्माण करून त्या वस्तूला विशिष्ट रचनेमध्ये स्थिर करण्यासाठी उपयोगी असतात. शरीरातील धातूंचेही नेमके हेच कार्य असते. शरीर घटकांना विशिष्ट रचनेमध्ये स्थिर ठेवण्याचे किंवा त्यांची विशिष्ट रचना बांधून ठेवण्याचे कार्य ते करीत असतात. थोडक्यात, दोष शरीरातील क्रियांचे नियमन करतात, तर धातु शरीर घटकांना स्थिर ठेवण्याचे कार्य करतात. ढोबळ मानाने आयुर्वेदात उल्लेखित शरीर धातु हे आधुनिक वैद्यक शास्त्रातील उतींशी- टिश्यूंशी समतुल्य आहेत. आयुर्वेदाने रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र असे एकूण सात धातु वर्णिले आहेत. शरीरात निर्माण होणाऱ्या, श्रवणाऱ्या पोषक मूल्य असणाऱ्या सर्व द्रवांचा समावेश रस धातुमध्ये होतो. शरीराला जीवित ठेवणारा शरीर घटकांतील जीव टिकवणारा धातु म्हणजे रक्त धातु होय. मांस धातु हा ढोबळ मानाने मांसपेशीशी तर मेद धातु शरीरातील चरबीशी संबंधित आहेत. अस्थि धातु शरीरातील हाडे आणि मज्जा धातु शरीरातील मज्जा संस्थेचे घटक आहेत. सातवा शुक्र धातु हा गर्भधारणेत सहभागी होणाऱ्या पुंबीजाशी संबंधित आहे. हे सातही धातु प्रत्यक्ष परीक्षण योग्य आहेत. त्यात अवैज्ञानिक अथवा छद्मवैज्ञानिक असे काही नाही.

तिसरा शरीर घटक गट म्हणजे, मलांचा गट होय. मल, मूत्र, स्वेद आणि कान, नाक इत्यादी अवयवांत साठणारा मल यांचा या गटांत समावेश होतो. हेही सर्व प्रत्यक्ष परीक्षणयोग्य आहेत. यातही कांही छद्मविज्ञान नाही.

कोणत्याही वस्तूचे, क्रियेचे, घटनेचे वर्णन संबंधितांच्या उपयोगितेनुसार केले जात असते. त्या उपयोगितेचा संदर्भ लक्षात घेऊनच संबंधित वर्णनाचे मूल्यमापन केले जाऊ शकते. अगदी साधे उदाहरण घ्यायचे, तर खाद्य पदार्थांचे वर्गीकरण एखादा आहार तज्ञ पोषणाचा विचार करता कार्बोहायड्रेट, प्रोटिन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स असे करतो. तर सामान्य माणूस तृणधान्ये, कडधान्ये, फळे, भाज्या असे त्यांच्या स्वरूपावरून वर्गीकरण करतो. कारण दोघांच्याही गरजा वेगळ्या, संदर्भ वेगळे असतात. अशा परिस्थितीत एखादा आहार तज्ञ सामान्य माणसाने केलेले खाद्य पदार्थांचे वर्गीकरण अवैज्ञानिक किंवा छद्मवैज्ञानिक असे म्हणू लागला, तर ते त्याचे अज्ञान आहे. याच रीतीने आयुर्वेदाने केलेले शरीरातील घटकांचे, क्रियांचे वर्णन वैद्याला रूग्ण चिकित्सा योजना करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे आहे. या संदर्भाकडे दुर्लक्ष करून संपूर्ण आयुर्वेदाला अवैज्ञानिक किंवा छद्मविज्ञान म्हणणे, हे संबंधिताच्या अज्ञानाचे प्रदर्शक आहे.

स्वतःला उच्चशिक्षित वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे समजणाऱ्या लोकांमध्ये आयुर्वेदाबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज प्रचलित आहेत. या प्रत्येक गैरसमजाचे क्रमाक्रमाने निराकरण करण्याचा प्रयत्न "आयुःरंग शहरी जीवन आणि आयुर्वेद" या लेखमालेतून आपण करणार आहोत. यातील लेख सामान्य लोकांसाठी असल्याने यात वैज्ञानिकांना अपेक्षित असलेले प्रत्यक्ष प्रयोगाचे पुरावे नाहीत. कारण ती त्यांची जागा नाही. यात वैज्ञानिक पारिभाषिक शब्दांचा वापरही टाळण्यात येत आहे. या लेखमालेतून आयुर्वेद हे एक विज्ञानाधिष्ठित शास्त्र असल्याचे स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.

डॉ. श्रीराम सावरीकर हे एम. डी. (आयु), पीएच. डी. असून, पोदार मेडिकल कॉलेज (आयु) येथील माजी प्राध्यापक आहेत.

Share this article:
Back to Articles