WhatsApp

आयुर्वेदिक औषध हे अन्नद्रव्य नव्हे !

April 01, 2026
Share:

आयुर्वेदिक औषध : औषध की अन्नद्रव्य ?

डॉ. श्रीराम सावरीकर

लोकांना औषध घेतल्याशिवाय आजाराची चिकित्सा झाल्याचे समाधान मिळतच नाही. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरने औषधाविना चिकित्सा केलेली लोकांच्या पचनी पडत नाही. आयुर्वेदिक डॉक्टरने अॅलोपॅथिक औषधाला पर्यायी आयुर्वेदिक औषधच द्यावे, अशी लोकांची अपेक्षा असते. म्हणूनच आयुर्वेदिक औषधांचा बाजार सतत गरम असतो. त्यांतच जसे अॅलोपॅथिक औषध घेण्यासाठी औषधाच्या दुकानात जावे लागते, तसेच त्यासाठी डॉक्टरच्या चिट्ठीचीही आवश्यकता असते. तसे आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत असत नाही. जाहिरातीच्या माध्यमातून आयुर्वेदिक औषधी उद्योजकांनी समाजात प्रसिद्ध केलेली अनेक आयुर्वेदिक औषधे किराणा दुकानातही सहज मिळू शकतात. त्यातच आता फूड सप्लिमेन्ट्स म्हणजेच पूरक अन्न द्रव्ये किंवा न्युट्रास्युटिकल्सच्या नावाने आयुर्वेदिक औषधे देशात आणि विदेशात अनेक डिपार्टमेन्टल स्टोअर्सच्या शेल्फवर विराजमान असलेली आढळून येत आहेत. हे पाहून आयुर्वेदिक औषधे औषध आहेत, की पूरक अन्न द्रव्ये, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. याच प्रश्नाचा ऊहापोह प्रस्तुत लेखात घेण्यात येत आहे...

आयुर्वेदिक औषधांना कायदेशीररित्या औषधांचा दर्जा
भारतामध्ये औषध व प्रसाधन अधिनियम १९४० अन्वये आयुर्वेदिक औषधांना कायदेशीररित्या औषध म्हणून मान्यता आहे. या अधिनियमांतील प्रकरण ४ (अ) हे आयुर्वेदिक, सिद्ध व युनानी औषधांसाठीच समर्पित करण्यात आले आहे. त्यांत आयुर्वेदिक औषधांची व्याख्याही निर्धारित करण्यात आली आहे. असे असले तरी भारत, श्रीलंका आणि दक्षिणपूर्व आशियातील निवडक देश वगळता सर्व जगभरात या औषधांना औषध म्हणून मान्यता नाही. अनेक देशामध्ये ही औषधे फूड सप्लिमेन्ट्स या नावाखाली ग्रोसरी स्टोअर्समधून आणि ऑन लाइन मार्केटमधून सर्रास विकली जात आहेत. भारतातही कायदेशीर मान्यता असूनही आयुर्वेद व्यावसायिक वैद्यवर्ग वगळता समाजाच्या आणि अगदी शासकीय अधिकाऱ्यांच्या नजरेमध्ये सुद्धा या औषधांना अॅलोपॅथिक औषधासारखे औषध म्हणून सामान्यतः स्वीकारले जात नाही.

नियंत्रण औषध नियंत्रकांचे की अन्न नियंत्रकांचे?

भारत सरकारने कायदेशीररित्या आयुर्वेदातील अनेक औषधी वनस्पतींचा समावेश फूड सप्लिमेन्ट किंवा न्युट्रास्युटिकल्समध्ये केला आहे. फूड सेफ्टी अँड स्टैंडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) आयुर्वेदिक आहार उत्पादने नियम २०२२ प्रसिद्ध करून त्यांत आयुर्वेद ग्रंथात उल्लेखित आहार पदार्थांना अन्नद्रव्यामध्ये 'आयुर्वेदिक आहार उत्पादने' या नावाने स्वतंत्र वर्गीकृत केले आहे. वास्तविक हे आहार पदार्थ सामान्य आहार पदार्थामध्ये समाविष्ट होतेच. त्यामुळे त्यांना वेगळे वर्गीकृत करण्याची आवश्यकता नव्हती. पण केवळ उद्योजकांचे हित साधण्यासाठी त्यांचा 'आयुर्वेदिक आहार पदार्थ' असा स्वतंत्र वर्ग केला असल्याचे दिसते. यामुळे नुकसान झाले, ते आयुर्वेदिक औषधांचे. कारण 'आयुर्वेदिक आहार' या वर्गात केवळ संबंधित पदार्थच नव्हे, तर त्यांत वापरले गेलेल प्रत्येक वनस्पती द्रव्य केवळ औषधी न राहता कायद्याने ते आहार द्रव्य वा पूरक आहारद्रव्य होऊन गेले आहे. त्यामुळे ही औषधी द्रव्ये आता एकाच वेळी औषध म्हणून औषध नियंत्रकांच्या आणि अन्नद्रव्य म्हणून अन्न नियंत्रकांच्या नियंत्रणाखाली गेली आहेत.

आयुर्वेदिक औषध 'एफएमसीजी 'चा स्रोत ?

अन्नद्रव्यांचे दर्जा निर्धारक निकष हे औषधी द्रव्यांच्या दर्जा निकषांच्या तुलनेत खूपच मवाळ असतात. त्यांचा उत्पादन खर्चही कमी असतो. त्यांच्या विक्रीसाठी उत्पादकाला डॉक्टरची शिफारस लागत नाही सिने तारे आणि चलनी खेळाडूंचा वापर करून टीव्ही आणि भल्यामोठे डोळे दिपवणारे जाहिरात फलक यांचा वापर करून आपले उत्पादन उद्योजक लोकांच्या गळी उतरवत असतात. त्यामुळे बहुसंख्य आयुर्वेदिक औषधी उद्योजक आता औषधी उत्पादने सोडून पूरक अन्न द्रव्ये उत्पाद‌नाकडे वळत आहेत. उद्योग जगत आज आयुर्वेदाकडे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) म्हणजे, जलद विकल्या जाणाऱ्या ग्राहकापयोगी उत्पादनांचा प्रमुख स्रोत म्हणून बघत आहे. परिणामी दैनंदिन वापरातील मसाले, आयुर्वेदातील वात, पित्त, कफ यासारख्या पारिभाषिक संज्ञांची वा समाजात सुपरिचित तुळस, अश्वगंधा, शतावरी इ. सारख्या औषधी वनस्पतींची लेबले लावलेली सामान्यांना भुलवणारी चहासारखी पेये, दुधांत वा अन्य पेयांत मिसळून सेवन करण्यायोग्य विविध ऊर्जावर्धक प्रथिनयुक्त वा तत्सम मिश्रणे, कुठली तरी औषधी वनस्पती नाममात्र मिसळलेली केशतेल, साबण, फेस क्रीम्स, लोशन्स, शाम्पू इत्यादि विविध सौंदर्य प्रसाधने अशा उत्पादनांनी जगभरातील मार्केट्स आज दुथडी भरून वाहताना दिसताहेत.

ही सर्व उत्पादने त्यात वनस्पती मिश्रित असल्याचा फायदा घेऊन जाहिरातींच्या माध्यमातून ती आयुर्वेदिक औषध म्हणून लोकांच्या मनात बिंबवून विकली जात आहेत. त्यामुळे काही मध्यमवर्गीय व उच्चभ्रू घरातील महिन्याच्या किराणा सामानाच्या यादीत ही पूरक अन्नद्रव्ये सर्रासपणे दिसून येऊ लागली आहेत. या उत्पादनावरील लेबलमध्ये आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची नावे पाहून आयुर्वेदिक औषधांना साइड इफेक्ट्स नसतात, तसेच ती शरीरास हानीकारकही नसतात अशा दृढ गैरसमजुतीमुळे, ते घेतल्यास त्यामुळे फायदा नाही तरी काही नुकसान होणार नाही, असे गृहीत धरून सामान्य लोक ही उत्पादने कोणत्याही योग्य वैद्यकीय सल्ल्याशिवाय दीर्घकाल सेवन करीत असल्याचे दिसून येत आहे.

या अशा गैरसमजुतीमुळे आणि गैरवापराच्या परिणामी आयुर्वेदिक औषध सेवनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊन समाजातील जाणकार वर्गामध्ये केवळ आयुर्वेदिक औषधांनाच नव्हे, तर एकूणच आयुर्वेदाला नकारात्मक प्रसिद्धी प्राप्त होत आहे. त्यातूनच आयुर्वेद हे छ‌द्मविज्ञान आहे. आयुर्वेदिक औषधांमुळे यकृत आणि मूत्रपिंडादि अवयवांना हानी पोचते. यासारखे गैरसमज वेगाने पसरू लागले आहेत.

आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीसाठी परवाना आवश्यक नाही!

सामान्य लोकामध्ये आयुर्वेदिक औषधांच्या वापरासंबंधी गैरसमज पसरविण्यास आणि त्यांना नकारात्मक प्रसिद्धी मिळण्यास संबंधित उत्पादनांचे उत्पादक प्रामुख्याने कारणीभूत आहेत. कारण अशा गैरसमजुतीवरच त्यांच्या उत्पादनांची विक्री अवलंबून असते. या उत्पादकांची सरकार दरबारी कार्यरत लॉबी अशा उत्पादनांच्या निर्मितीवर व विक्रीवर नियंत्रण आणण्याचे सर्व प्रयत्न मुळात सुरूच होऊ देत नाही. सुरू झालेच तर ते पद्धतशीरपणे उधळून लावत असते. आयुर्वेदिक औषधे उत्पादनांसाठी परवाना लागत असला तरी त्यांच्या विक्रीसाठी कुठलाच परवाना लागत नाही. एखादा अशिक्षित फेरीवालाही कुठेही बसून वा फिरत्या गाडीमधून आयुर्वेदिक औषधांची विक्री करू शकतो. म्हणूनच आयुर्वेदिक औषधे फेरीवाला, भुसार मालाच्या दुकानापासून ते ऑनलाइन खरेदीद्वारे देशात परदेशात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सहजपणे कुठेही मिळू शकतात.

वस्तुतः आयुर्वेदिक औषध विक्री करण्यासाठी विक्रेत्याकडे किमान मॅट्रिक उत्तीर्णतेची शैक्षणिक पात्रता असावी एवढी अट लागू करावी, असे सरकारला सुचत नाही, हे अत्यंत आश्चर्य आहे.

औषध व अन्नद्रव्य यातील फरक

औषध त्याच्या कार्यशक्तीने तर अन्नद्रव्य त्याच्या रसाने कार्य करते, असे आयुर्वेद सांगतो. ही गोष्ट खरी आहे, की आहारातील अनेक अन्नद्रव्ये उदा. धने, जिरे, सुंठ, मिरे, हिंग, मोहरी यासारख्या नित्य वापरल्या जाणाऱ्या अनेक बनस्पती आयुर्वेद चिकित्सेमध्ये औषध म्हणून मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असतात. पण म्हणून त्या कशाही वापरल्या तरी त्यांनी कोही शारीरिक हानी होत नाही असे, समजणे हे अज्ञानाचे लक्षण आहे.

येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की वर उल्लेख केलेले पदार्थ दैनंदिन वापरामध्ये नेहमीच कुठल्या तरी अन्न पदार्थामध्ये म्हणजे भाजी, चटणी, कढी, आमटी इत्यादिंना चविष्ट बनविण्यासाठी त्यात मिसळून बापरले जात असतात. आहारामध्ये ते एकटे सहसा सेवन केले जात नाहीत. म्हणजे नुसती सुंठ किंवा नुसता हिंग किंवा कुठलाही मसाल्याचा पदार्थ एकटा स्वतंत्रपणे सेवन केला जात नाही. याउलट यातील अनेक पदार्थ आयुर्वेद चिकित्सेमध्ये औषध म्हणून एकटे स्वतंत्रपणे कशातही न मिसळता मोठ्या प्रमाणांत वापरले जात असतात. अन्न पदार्थात उपरोक्त द्रव्ये चवीसाठी मिसळली जात असतात, तर औषधात ती त्यांच्या औषधी कार्यासाठी वापरली जात असतात. त्यामुळेच जेव्हा जेव्हा हा पदार्थ औषध म्हणून वापरला जातो, तेव्हा तेव्हा त्याचे प्रमाण आहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या त्याच्या नित्याच्या प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक असते. उदा; आहारातील पदार्थामध्ये सुंठ चिमूट भर म्हणजे १००-२०० मि. ग्रॅ. वा अधिकात अधिक ५०० मि. ग्रॅ. प्रमाणात मिसळली जाते. असे सुंठ मिसळणे हा पाककृतीचा भाग आहे. त्यासाठी कुठल्याही वैद्यकीय वा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता नसते. तसेच असा सुंठ मिसळलेला पदार्थ कुणीही सेवन करू शकतो. हीच सुंठ आयुर्वेद चिकित्सेमध्ये १० ग्रॅ. पर्यंत तीही कशातही न मिसळता एकेरी वापरली जाऊ शकते. पण इतक्या मोठ्या प्रमाणात ती वापरण्याचा सल्ला रुग्णाची तपासणी करून आवश्यकतेनुसार देण्याची पात्रता केवळ वैद्यच बाळगत असतो. असे औषध घेताना चूक होऊन ते सेवन करणाऱ्याच्या शरीरास अपायकारक नक्कीच ठरू शकते. पण त्यावेळी त्या चुकीची जबाबदारी वैद्याची ठरेल. नित्य वापरातील काही वनस्पती उदा. लवंग, वेलची, सुपारी, बडिसोप इत्यादि अल्प प्रमाणात एकेरी सेवन केली जात असतात. हेही पदार्थ अधिक प्रमाणात सेवन केले, तर ते शरीरास हानीकारक ठरतातच. म्हणूनच मसाल्याचे वा नित्याच्या आहारातील कोणताही पदार्थ मग ती वनस्पती असो वा अन्य काही, तो पदार्थ औषध म्हणून केवळ तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्याने सेवन केला, तरच तो हानीकारक न ठरता रोगनाशक ठरू शकतो, याची खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधून ठेवणे अत्यावश्यक आहे.

आयुर्वेदिक औषधांना साइड इफेक्ट्स नाहीत?

औषध म्हटले, की दुष्परिणाम हा त्याचा स्थायी अंगभूत भाव आहे. मग ते औषध अॅलोपॅथी, होमिओपॅथी वा आयुर्वेदिक कोणतेही असो, त्याने काही फरक पडत नाही. कोणत्याही औषधाचा अयोग्य पद्धतीने वापर हा नेहमीच हानीकारक ठरत असतो. म्हणूनच औषध मग ते कुठलेही असो ते योग्य जागी वा योस्य प्रमाणात वापरले तरच फायदेशीर ठरते, अन्यथा त्याचा दुष्परिणाम होणारच होणार हे निश्चित. आयुर्वेदिक औषधासहित कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे सर्वथा अयोग्य आहे. आयुर्वेदिक औषधांना साइड इफेक्ट्स नाहीत. ती शरीरास हानी करत नाहीत, असे मानणे अज्ञानमूलक आहे. या गैरसमजामुळे आयुर्वेदिक औषधे वैद्याच्या सल्ल्याशिवाय ते दीर्घकालपर्यंत सेवन केल्यामुळे शरीरावरील घातक परिणाम झाल्याची अनेक प्रकरणे घडत आहेत. गंभीर दुष्परिणामांना आयुर्वेदिक औषध नव्हे, तर त्याचा स्वैर गैरवापर हे कारण आहे. दुष्परिणामास औषध नव्हे, तर त्याचे सेवन केले जाणारे प्रमाण, कारणीभूत असते असे फार्माकॉलाजी म्हणजे औषधी गुणधर्मशास्त्र सांगते.

त्यामुळे कोणतेही औषध मग ते आयुर्वेदिक असो वा अॅलोपॅथिक दुष्परिणाम हा त्याचा अंगभूत गुण आहे. तरीही या वैज्ञानिक तथ्याकडे डोळेझाक करून आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त रिसर्च जर्नल्समध्ये ख्यातनाम तज्ज्ञ संशोधक आपल्या संशोधन लेखामध्ये रूग्णाच्या यकृत, मूत्रपिंडादि अवयवामध्ये झालेल्या बिघाडांना तो रूग्ण घेत असलेल्या आयुर्वेदिक औषधांनाच जबाबदार धरत असतात, असे निदर्शनास येत आहे.

वास्तविक दुष्परिणामास औषधाला जबाबदार धरण्यापूर्वी संबंधित औषध त्या रुग्णाने घेणे योग्य होते का? ते निर्देशित प्रमाणापेक्षा आणि कालावधीपेक्षा अधिक घेतले होते का? तो रूग्ण तज्ज्ञ वैद्याच्या निगराणीखाली होता का? याची शहानिशा होणे आवश्यक असते. पण रूग्णावर झालेल्या घातक परिणामास आयुर्वेदिक औषध जबाबदार असल्याचे निष्कर्ष काढणाऱ्या संशोधन लेखातील सर्वच प्रकरणामध्ये उपरोल्लेखित सर्वच बाबींचे नियमितपणे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. यातील अनेक विशेषतः परदेशस्थ रूग्ण आयुर्वेदिक औषधांना फूड सप्लिमेन्ट्स अथवा घरगुती उपचार समजून ग्रोसरी स्टोअर्स अथवा ऑनलाइन मार्केट मधून विकत घेऊन स्वतःच्या मनानेच आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणामध्ये तेही दीर्घकालपर्यंत सेवन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा स्वैराचाराचे त्यांच्या शरीरावर घातक परिणाम झाले तर त्यात आश्चर्य ते काय ?

आयुर्वेदिक औषधे आणि हेवी/टॉक्सिक मेटल्सचा बागुलबुवा

समाजातील तथाकथित सुशिक्षित वर्गामध्ये आयुर्वेदिक औषधामध्ये हेवी / टॉक्सिक मेटल्स असल्यामुळे ती शरीरास घातक असल्याचा समज दृढ झालेला आहे. हा समजही असाच अज्ञानमूलक आहे. आयुर्वेदिक औषधे प्राणिज, बनस्पतीज व खनिज अशा तिन्ही प्रकारच्या द्रव्यांपासून बनवली जात असतात. काही औषधे पूर्णतः वनस्पतीज वा पूर्णतः प्राणिज द्रव्यांची असतात. अशा औषधांमध्ये कोणतेही टॉक्सिक मेटल्स शरीरास घातक ठरतील, इतक्या प्रमाणात असू नयेत याची काळजी औषधी उत्पादकांनी घेणे अपेक्षित आहे. तिसऱ्या प्रकारची औषधे ही खनिज द्रव्यापासूनच म्हणजे अनेकदा हेवी मेटल्स पासूनच तयार केलेली असतात. त्यांच्या घातक परिणामांची तज्ज्ञ वैद्यास चांगली जाण असते. त्यामुळे तो अशी औषधे अत्यंत काळजीपूर्वक रुग्णांना देत असतो. या प्रकारच्या औषधांचा वापर वैद्याच्या सल्ल्याने आणि त्याच्या निगराणीखालीच करावयाचा असतो. अशा औषधांची ढोबळ तुलना शरीरास अत्यंत घातक असूनही कॅन्सर रुग्णांना नियमितपणे दिल्या जाणाऱ्या अॅलोपॅथिक औषधांशी करता येईल.

आयुर्वेदिक औषधांमधील टॉक्सिया मेटल्स संबंधांतील भीती अत्यंत अज्ञानमूलक आहे. ही भीती बाळगणाने लोखा आयुर्वेदिक औषधांना अन्नद्रव्य समजून अन्नद्रव्यासाठीच्या टॉक्सिक मेटल्सच्या स्वीकाराई मयदिचे निर्धारित प्रमाण आयुर्वेदिक औषधांना लागू करीत आहेत. असे करणे अत्यंत चुकीचे आहे. कारण अन्नद्रव्य च औषधी द्रव्य पांचे निकष पूर्णतः वेगळे आहेत. या लोकांनी आयुर्वेदिक औषधांचा प्रथम औषध म्हणून स्वीकार करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी या स्वीकाराई मर्यादा द्रव्यातील भेसळीच्या मर्यादा निर्धारित करणान्या आहेत, हेही ध्यानात घेणे आवश्यक आहे...

औषधी वनस्पती निसर्ग निर्मित असतात. दैनंदिन वापरासाठी त्या निसर्गातून जमा करताना, त्यांचा साठा करताना, हाताळताना त्यामध्ये कचरा, माती इत्यादिच्या संपर्कातून कॅडमियम, लेड, अर्सेनिक, पारा यासारखे टक्सिक मेटल्स निसर्गतःच मिसळले जात असतात. म्हणूनच निसर्गात मिळणाऱ्या वनस्पतीतील त्यांची उपस्थिती पूर्णपणे टाळता येत नाही. परंतु विविध उपायांनी त्यातील प्रमाण मर्यादित करता येते. म्हणूनच जेव्हा आयुर्वेदिक औषधामध्ये टॉक्सिक मेटल्स औषध म्हणून नव्हे, तर भेसळ म्हणून उपस्थित असतात, तेव्हा मात्र त्यांना औषधासाठी निर्धारित भेसळीच्या स्वीकारार्ह मर्यादा लागू असतात. अन्नद्रव्ये आणि औषधामधील हेवी/टॉक्सिक मेटल्सच्या भेसळीची नैसर्गिक अनिवार्यता ध्यानात घेऊन मानवी शरीरासाठी त्यांच्या सुरक्षित प्रमाणाच्या स्वीकारार्ह मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. या मर्यादा अन्नद्रव्ये आणि औषधी द्रव्यांसाठी वेगवेगळ्या आहेत. लेड, मर्क्युरी, कॅडमियम, अर्सेनिक यासारख्या धातूंच्या अन्न पदार्थ आणि औषधी द्रव्यामधील स्वीकारार्ह मर्यादा वेगवेगळ्या ठरवण्यात आल्या आहेत. अन्न द्रव्य हे मोठ्या प्रमाणांत म्हणजे ग्रॅम्समध्ये आणि सामान्यतः नित्य किंवा वारंवार दीर्घकाल सेवन केले जात असते. त्यांच्या अशा नित्य व दीर्घकालीन सेवनामुळे त्यातील हेवी मेटल्स शरीरांत हळूहळू साचत जात असतात. त्यांचे शरीरातील प्रमाण वाढत ते घातक पातळी गाठताच त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. त्यामुळे त्यांतील हेवी/टॉक्सिक मेटल्सच्या नैसर्गिक भेसळीची स्वीकार्य मर्यादा अत्यंत कमी असते.

औषध हे काही नित्य सेवनाचे द्रव्य नाही. ते केवळ डॉक्टर/वैद्याच्या निर्देशनाने त्याच्या देखरेखीखाली त्याने निर्देशित केलेल्या प्रमाणांत म्हणजे मि.ग्रॅ. मध्ये व मर्यादित कालावधीसाठी म्हणजे सामान्यतः अधिकात अधिक ७ दिवस पर्यंतच सेवन केले जात असते. ते असे योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात घेतल्यास त्यातील हेवी मेटल्स शरीरात घातक परिणाम करण्याच्या पातळीपर्यंत साठत जाण्याची शक्यता नसते. म्हणूनच त्यातील हेवी मेटल्सची स्वीकारार्ह मर्यादा अन्न पदार्थातील हेवी मेटल्सच्या स्वीकारार्ह मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक असते. म्हणजे अन्न द्रव्यांतील हेवी/टॉक्सिक मेटल्सच्या नैसर्गिक भेसळीची स्वीकारार्ह मर्यादा पीपीएम या मानकांत तर औषधांतील स्वीकारार्ह मर्यादा मायक्रो ग्रॅम्सच्या

मानकांत दर्शवली जात असते. अन्न वा औषध द्रव्यातील संबंधित टॉक्सिक मेटल्सचे प्रमाण संबंधित निर्धारित स्वीकारार्ह मयदिच्या बाहेर असेल, तर ते द्रव्य शरीरास हानीकारक ठरू शकते.

औषधी द्रव्याच्या अल्पकालीन व अल्पमात्रेतील सेवनामुळे हेवी/टॉक्सिक मेटल्सचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हे तत्कालिक असतात. औषध बंद करताच ते दुष्परिणाम आपोआप दूर होतात. अन्नद्रव्यांच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. त्यांच्या अतिमात्रेतील व दीर्घकालीन सेवनामुळे हेवी/टॉक्सिक मेटल्सचे होणारे दुष्परिणाम दीर्घकालिक व काही वेळा कधीही दूर न होणारे असू शकतात.

आयुर्वेदिक औषधामधील हेवी मेटल्सचे औषधी परिणाम

वनस्पती द्रव्यांमध्ये टॉक्सिक मेटल्स हे नेहमीच नैसर्गिक भेसळीच्या परिणामी मिसळले जात असतात. परंतु इतर औषधांबाबत असे असतेच असे नाही. अनेकदा विशेषतः आयुर्वेद चिकित्सेमध्ये त्यांच्या औषधी परिणामांचा फायदा मिळवण्यासाठी हेवी/टॉक्सिक मेटल्स स्वतंत्रपणे वा औषधात जाणीवपूर्वक मिसळले जात असतात. त्यांना भेसळीच्या प्रमाणाच्या मर्यादा लागू होत नाहीत. अशा औषधांच्या मात्रा (डोज) विचारात घेतल्या जात असतात. असे डोज ठरवणे हे डॉक्टरचे काम आहे.

इंटरनॅशनल कौन्सिल फॉर हार्मनायझेशन ऑफ टेक्निकल रिक्वायरमेन्ट्स फॉर फार्मास्युटिकल्स फॉर ह्युमन युज (आयसीएच) सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जेव्हा एखाद्या औषधामध्ये टॉक्सिक मेटल्स त्याच्या औषधी गुणधर्मांचा फायदा मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक मिसळले जात असतात तेव्हा त्यांच्या प्रमाणांना सामान्य स्वीकारार्ह मर्यादा लागू होत नाहीत. आयसीएचच्या स्वीकारार्ह मर्यादा या औषधातील टॉक्सिक इलेर्मेन्ट्सच्या भेसळीसाठी लागू आहेत. अमेरिकन अन्न व औषध प्रशासन, युरोपियन मेडिसिन एजन्सी यासारख्या संस्थांनी आयसीएचच्या या मार्गदर्शक सूचना स्वीकारल्या आहेत वरील गोष्टी विचारांत घेऊन वैज्ञानिक परिभाषेमध्ये अन्न पदार्थातील हेवी मेटल्सचे स्वीकारार्ह प्रमाणास हेवी मेटल लिमिट्स संबोधले जाते, तर औषधी द्रव्यातील प्रमाणास परमिटेड डेली एक्स्पोजर (पीडीई) संबोधले जाते. या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय अधिकारी संस्थांनी ही स्वीकारार्ह

प्रमाणे ठरवून दिली आहेत. ती पुढीलप्रमाणे आहेत.

टॉक्सिक मेटल अन्न पदार्थातील स्वीकार्य प्रमाण औषधातील स्वीकार्य प्रमाण पीडीई
लेड (शिसे) १० पीपीएम ५ मायक्रोग्रॅम्स प्रतिदिन
अर्सेनिक १ पीपीएम १५ मायक्रोग्रॅम्स प्रतिदिन
मर्क्युरी १ पीपीएम ३० मायक्रोग्रॅम्स प्रतिदिन
कॅडमियम ३ पीपीएम १ मायक्रोग्रॅम्स प्रतिदिन

संदर्भ :

१. आयसीएचक्यु ३ डी गाइड लाइन्स ऑन इलेमेन्टल इम्प्युरिटीज

२. इंटरनॅशनल कौन्सिल फॉर हार्मनायझेशन ऑफ टेक्निकल रिक्वायरमेन्ट्स फॉर फार्मास्युटिकल्स फॉर ह्युमन युज (आयसीएच)

३. युएस फूड अँड ड्रग अॅडमिस्ट्रेशन (एफडीए) अँड द ययुरोपियन मेडिसिन्स एजन्सी (इएमए)

औषधाचे सेवन वैद्याच्या / डॉक्टरच्या निगराणीखाली होणे आवश्यक

वैद्याच्या निगराणीखाली हेवी मेटल्सयुक्त औषध सेवन केल्यास ते योग्य कारणासाठी, योग्य प्रमाणात व योग्य कालावधीपर्यंतच सेवन केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. शिवाय या कालावधीत औषधाच्या होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामावर वैद्याचे लक्ष असतेच. त्यामुळे असे कोणतेही दुष्परिणाम तो घडू देत नाही आणि एखाद्या वेळी घडण्याची शक्यता दिसलीच, तर सबंधित औषध वेळीच थांबवून त्यावर योग्य ती उपाय योजनाही वैद्य करतातच. पण या उलट वैद्याच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनानेच घरगुती उपाय म्हणून वा फूड सप्लिमेन्ट्स म्हणून आयुर्वेदिक औषधे घेतली, तर ती चुकीच्या कारणासाठी, शरीरास हानीकारक प्रमाणात व दीर्घ

कालावधीपर्यंत घेतली जातात. अशा वेळी कोणत्याही तज्ज्ञ वैद्याची त्या रूग्णावर निगराणी नसल्यामुळे त्या औषधाचे दुष्परिणाम लक्षात न येता ते शरीरास घातक ठरणाऱ्या घटना घडतात. त्यात आयुर्वेदिक औषधामध्ये टॉक्सिक मेटल्स असतात. असे म्हणून त्यावर सर्व दोष कसा ढकलता येईल? याचा सारासार विचार सुज्ञांनी करावयास हवा.

म्हणूनच आयुर्वेदिक औषधाला घरगुती उपचार वा फूड सप्लमेंन्ट्स, न्युट्रास्युटिकल्स संबोधून स्वतःच्या मनाला वाटेल, तसे ते सेवन करणे घातक आहे. कोणतेही आयुर्वेदिक औषध तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्याशिवाय सेवन करणे धोकादायक आहे. आयुर्वेदिक औषध सेवनाच्या दुरुपयोगाने झालेल्या दुष्परिणामांच्या काही निवडक प्रकरणांचे दाखले देऊन वैज्ञानिक निकषांकडे दुर्लक्ष करून स्वयंघोषित वैज्ञानिकांसहित सर्वांनी समाज माध्यमे आणि संशोधन पत्रिकांच्या माधमातून आयुर्वेदाच्या नावाने खडे फोडणे, हे तर अज्ञानाचे लक्षण आहे. आयुर्वेदिक औषध हे अन्नद्रव्य नव्हे, ते औषध आहे. ते कुणी अन्नासारखे सेवन करीत असेल आणि त्यामुळे दुष्परिणाम होत असतील, तर दोष औषधाचा की ते सेवन करणाऱ्याचा?


डॉ. श्रीराम सावरीकर हे एम. डी. (आयु), पीएच. डी. असून, आयुर्वेद प्राध्यापक तसेच गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू, भारत सरकारचे माजी आयुर्वेद सल्लागार आणि भारत सरकारच्या आयुर्वेद फार्माकोपिया समितीचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. त्यांची रसचंडांशु हिन्दी टीका, शारंगधर संहिता इंग्रजी टीका तीन खंड, अर्वाचीन आयुर्वेदायन, आयुर्वेद फाउंडेशन ऑफ हेल्दी लाइफ, इंग्रजी, वैद्यकीय सांख्यिकी शास्त्र हिंदी आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. संपर्क: sssavrikar@gmail.com

Share this article:
Back to Articles