WhatsApp

गुणवत्ता आयुर्वेदिक औषधांची

July 15, 2026
Share:

"बाजारात विकल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक औषधांची गुणवत्ता हा अत्यंत गंभीर विषय आहे. तरीही आयुर्वेदिक औषध निर्माते, विक्रेते आणि समाज या विषयाबाबत अत्यंत उदासीन आहेत. आयुर्वेदिक औषधांची गुणवत्ता आणि वैधानिक मानके याविषयी सविस्तर मार्गदर्शन..."

बाजारात विकल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक औषधांची गुणवत्ता हा अत्यंत गंभीर विषय आहे. तरीही आयुर्वेदिक औषध निर्माते, औषध विक्रेते, वितरक, आयुर्वेदिक डॉक्टर, ते औषध खरेदी करून सेवन करणारा ग्राहक, ग्राहक सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि एकूणच समाज या विषयाबाबत अत्यंत उदासीन आहेत. आयुर्वेदिक औषधे नैसर्गिक असल्यामुळे त्यांपासून कांही शारीरिक हानी होत नाही, हा सार्वजनिक गैरसमज हे याचे प्रमुख कारण होय. वास्तविक आयुर्वेदिक औषधाचे गुणवत्ता निर्धारक वैधानिक निकष केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेले आहेत. केवळ त्यांचे पालन होते की नाही, यावर नियंत्रण ठेवणे हे राज्य स्तरावरील औषध नियंत्रक प्रशासनाचे कर्तव्य आहे. ज्याकडे या ना त्या कारणाने राज्य प्रशासने दुर्लक्ष करतात असे दिसून येते. स्वयंप्रेरणेने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आयुर्वेदिक औषध सेवन करणाऱ्या लोकांची संख्या समाजामध्ये खूप अधिक आहे. त्यामुळे गुणवत्ताहीन सदोष औषध सेवनाने आरोग्यास धोका पोहोचण्याची शक्यता खूपच बळावलेली असते...

औषधाची गुणवत्ता वर्णन करताना संपन्न, योग्य औषध आणि युक्त भैषज्य असे शब्द आयुर्वेद संहिता ग्रंथांत वापरले आहेत. औषधाचा अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी चिकित्सकासाठीच नव्हे, तर ते औषध सेवन करणाऱ्या व्यक्तीसाठीही हे शब्द मार्गदर्शक आहेत. यातील संपन्न व योग्य औषध हे शब्द औषध गुणवत्तादर्शक तर युक्त भैषज्य हे शब्द औषधाच्या योग्य वापराशी संबंधित आहेत. औषधाची संपन्नता व योग्यता औषध निर्मात्याच्या हाती, तर त्याची युक्तता म्हणजे योग्य वापर हा चिकित्सक व औषध सेवन करणारी व्यक्ती म्हणजेच रूग्णाच्या हाती असते. कोणतेही औषध संपन्न व योग्य असेल आणि त्याचा वापर योग्य झाला असेल, तर आणि तरच त्या औषधाचा अपेक्षित परिणाम दिसून येईल अन्यथा ते औषध केवळ निरूपयोगीच नव्हे तर अनेकदा आरोग्यास हानीकारकही ठरण्याची शक्यता असते.

फार्माकोपिया कमिशन

जगभरातील देश ॲलोपॅथिक औषधांची स्वीकारार्ह गुणवत्ता दर्शक मानके स्वतःच्या भेषज संहितेमध्ये म्हणजेच फार्माकोपियामध्ये प्रसिद्ध करीत असतात. काही देश त्यांचा स्वतःचा फार्माकोपिया नसेल तर अन्य देशाचा जसे की ब्रिटिश फार्माकोपिया (बी पी), यु एस. फार्माकोपिया (यु एस पी) इत्यादींचा संपूर्ण स्वीकार करतात. भारतामध्ये ॲलोपॅथिक औषधांची वैधानिक मानके इंडियन फार्माकोपियामध्ये (आय पी) मध्ये प्रसिद्ध केलेली आहेत.

ॲलोपॅथिक औषधांची गुणवत्ता दर्शक मानके निश्चित करण्याचे काम भारतीय भेषज संहिता आयोग म्हणजेच, इंडियन फार्माकोपिया कमिशन (आय पी सी) या संस्थेमार्फत चालते. याच धर्तीवर फार्माकोपिया कमिशन ऑफ इंडियन मेडिसिन अँड होमियोपॅथी (पी सी आय एम अँड एच) ही संस्था आयुर्वेद, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी औषधांची वैधानिक गुणवत्ता दर्शक मानके निश्चित करून ती आयुर्वेदिक फार्माकोपिया ऑफ इंडिया (ए पी आय) मध्ये प्रसिद्ध करीत असते. भारतातील सर्व आयुर्वेदिक औषध निर्मात्यांनी त्यांच्या औषधासाठी या मानकांचे पालन करणे वैधानिकदृष्ट्या बंधनकारक आहे. बाजारात विक्री व वितरित केले जाणारे एखादे औषध या मानकांची पूर्तता करीत नाही. असे आढळल्यास ते औषध तयार करणाऱ्या संबंधित औषध निर्मात्याला कायदेशीररित्या आर्थिक दंडच नव्हे, तर प्रसंगी कैद सुद्धा होऊ शकते.

ॲलोपॅथिक औषधांसंदर्भात असे घडल्याच्या अनेक बातम्या वृत्तपत्रातून आपल्या वाचनात येत असतात. पण आयुर्वेदिक औषधांबाबत काही वर्षापूर्वी उत्तर भारतात ऐन दिवाळीत अमृतसंजीवनी सुरा नावाचे अल्कोहोलयुक्त आयुर्वेदिक औषध सेवनाने मोठ्या संख्येत मृत्यू झाल्यामुळे झालेली कारवाई वगळता असे काही घडल्याचे प्रसंग अपवादात्मकच असतील. मे २०२६ च्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात मॅजिक रेमिडी ॲक्टचे उल्लंघन केल्यामुळे काही बड्या आयुर्वेदिक औषधी कंपन्यांच्या आयुर्वेदिक औषधांचे मोठे साठे महाराष्ट्र औषध नियंत्रण प्रशासन जप्त करीत असल्याच्या बातम्या सातत्याने वाचनात येत आहेत. यावरून महाराष्ट्र औषध प्रशासनाला या प्रश्नाचे गांभीर्य उमगू लागल्याचे दिसते. याचबरोबर निर्देशित वैधानिक गुणवत्ता मानकांची पूर्ती न करणाऱ्या आयुर्वेदिक औषधांवरही अशीच कारवाई अपेक्षित आहे.

सामान्य ग्राहकासाठी बाजारातून विक्री व वितरण केल्या जाणाऱ्या औषधांची गुणवत्ता ठरवून दिलेल्या वैधानिक मानकाप्रमाणे राखली जाते आहे, की नाही हे पाहणे हे जगभरातील औषध नियंत्रक यंत्रणांचे आद्य कर्तव्य असते. किंबहुना, त्यासाठीच या यंत्रणा निर्माण केलेल्या असतात. हे काम करण्यासाठी औषध निरीक्षकापासून ते आयुक्तापर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांची फौज तैनात केलेली असते. भारतात केंद्रीय स्तरावर सेंट्रल ड्रग्स स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ही संस्था देशभरातील औषध तसेच वैद्यकीय उपकरणे व सौंदर्य प्रसाधनांच्या मानकांचे निश्चितीकरण व नियमन करण्याचे काम करीत असते. तर प्रत्येक राज्यात विक्री व वितरण होणारी औषधे निर्देशित वैधानिक गुणवत्ता दर्शक मानकांची पूर्तता करतात की नाही, हे पाहण्याचे काम संबधित राज्य औषध नियंत्रण प्रशासनाचे असते.

आयुर्वेदिक औषधांचे गुणवत्ता नियंत्रण

भारतात ॲलोपॅथिक औषधांचे गुणवत्ता नियंत्रण व नियमन करणारी यंत्रणा प्रस्थापित झालेली आहे. ती अत्यंत प्रभावीपणे कार्यरतही आहे. पण आयुर्वेदिक औषधांच्या गुणवत्ता नियंत्रण व नियमनाची स्थिती मात्र अत्यंत दयनीय आहे. मुळात, आयुर्वेदिक औषधांच्या गुणवत्तेचे काही वैधानिक निकष अस्तित्वात आहेत, त्यावर नियंत्रणाची व नियमनाची आवश्यकता आहे, याचे औषध प्रशासनातील शासकीय अधिकाऱ्यांना फारसे गांभीर्य नाही, असे दिसते. शासकीय अधिकाऱ्यांची ही परिस्थिती असेल तर सामान्य जनतेबद्दल तर बोलायलाच नको. आयुर्वेदिक औषधे नैसर्गिक आहेत त्यांनी काही हानी होत नाही, अशा समजापोटी जनतेतील सुसंस्कृत व उच्चशिक्षित वर्गातील बुद्धिमंतही आयुर्वेदिक औषधांची खरेदी स्वयंपाकासाठी मसाल्याच्या पुड्या खरेदी केल्यासारखी करीत असतात. त्यामुळे त्यांच्या मनात आयुर्वेदिक औषधाच्या गुणवत्तेबाबत काही प्रश्न निर्माण होत नाहीत.

आयुर्वेदिक औषधे वनस्पती, खनिज अथवा प्राणिज यापैकी एकाच प्रकारापासून किंवा तिन्ही प्रकारची अथवा कोणत्याही दोन प्रकारची द्रव्ये एकत्र मिसळून बनवलेली असू शकतात. ॲलोपॅथिक औषधांमध्ये औषधी कार्य करणारे एकच एक रासायनिक द्रव्य नेमक्या प्रमाणात मिसळलेले असते. त्यामुळे ॲलोपॅथिक औषधांमधील संबंधित रासायनिक द्रव्यांचे नेमके प्रमाण तपासून पाहणे सोपे असते. असे आयुर्वेदिक औषधांबाबत घडत नाही. कारण एखादे आयुर्वेदिक औषध एकाच द्रव्यापासून बनलेले असले तरी त्यात एकच एक नेमके रासायनिक द्रव्य असत नाही. वनस्पती औषधांचे उदाहरण घ्यायचे तर एका वनस्पतीमध्ये अनेक प्रकारची वानस्पतिक रसायने म्हणजेच फायटोकेमिकल्स असतात. त्या प्रत्येकाचे औषधातील प्रमाण तपासणे शक्य नसते. त्यातच आयुर्वेदिक औषध एकापेक्षा अधिक द्रव्ये मिसळून बनवलेले असेल, तर हे काम अशक्य होऊन जाते. त्यामुळेच आयुर्वेदिक औषधांच्या गुणवत्ता मानकांची निश्चिती करणे अत्यंत किचकट काम आहे. असे असले तरीही औषधातील रासायनिक द्रव्यांच्या प्रमाणावर विसंबून न राहता आयुर्वेदिक औषधी वनस्पती, खनिजे वा प्राणिज द्रव्ये यांची नेमकी ओळख व एकूण औषधी परिणामकारकता दर्शवणारी स्थूल मापने व त्यातील भेसळ व सूक्ष्मजीवसंसर्गाचे स्थूल मापदंड निश्चित करून ते आयुर्वेदिक फार्माकोपियामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आयुर्वेदिक औषध निर्मात्यांनी त्यांच्या औषधासाठी या मापदंडांचे पालन करणे कायद्याने बंधनकारक आहे.

आयुर्वेदिक फार्माकोपिया

आयुर्वेदिक औषधामध्ये वापरल्या जाणाऱ्या एकूण ६६५ औषधी वनस्पती, खनिजे व प्राणिज द्रव्यांची गुणवत्ता निर्धारक मानके दर्शविणारे मोनोग्राफ फार्माकोपियाच्या पहिल्या भागाच्या १० खंडामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर फार्माकोपियाच्या दुसऱ्या भागाच्या पाच खंडातून २२४ तयार औषधांच्या गुणवत्तादर्शक मानकांचे मोनोग्राफ प्रसिद्ध झाले आहेत. फार्माकोपियामध्ये प्रसिद्ध झालेले कोणतेही औषध आयुर्वेदिक औषध निर्माता विक्रीसाठी तयार करीत असेल किंवा फार्माकोपियामध्ये उधृत औषधी द्रव्य वापरून अन्य एखादे औषध बनवत असेल, तर त्या औषधांनी वा द्रव्यांनी संबंधित मोनोग्राफमध्ये दर्शविलेल्या गुणवत्ता दर्शक मानकांची पूर्तता केलेली असणे औषधी निर्मात्यासाठी कायद्याने बंधनकारक आहे.

विक्री वा वितरित केले जाणारे आयुर्वेदिक औषध गुणवत्ता मानकांची अशी पूर्तता करीत नसेल तर संबधित औषधी निर्मात्याचा तो दंडनीय अपराध ठरतो. सामान्य वापरातील बहुसंख्य औषधी द्रव्यांचे गुणवत्ता निकष आयुर्वेदिक फार्माकोपियामध्ये प्रसिद्ध झालेले असले, तरी अशी अनेक औषधी द्रव्ये आहेत, की ज्यांची गुणवत्ता मानके निश्चित झालेली नाहीत. आयुर्वेदिक औषधांची गुणवत्ता मानके निश्चितीकरणाचे काम सतत सुरू असते. जशी जशी मानक निश्चिती होत जाते तशी तशी, ती मानके प्रसिद्ध करण्याचे कार्य संबंधित शासकीय यंत्रणा करीत असते.

औषधी उपयोग नाही, असे एकही द्रव्य जगात नाही. फक्त संबंधित द्रव्याचा वैद्याला औषधासाठी युक्तीपूर्वक वापर करता आला पाहिजे. अशा अर्थाचे एक विधान आयुर्वेदिक संहिता ग्रंथामध्ये आहे. एखादा औषध निर्माता फार्माकोपियामध्ये उल्लेख नसलेले एखादे आयुर्वेदिक औषधी द्रव्य त्याचे औषध बनवण्यासाठी वापरत असेल वा फार्माकोपियामध्ये उल्लेख नसलेले एखादे आयुर्वेदिक औषध तो बनवत असेल, तर त्याला स्वतःला संबंधित औषधाची गुणवत्ता मानके विकसित व निश्चित करून ती औषध नियंत्रकास सादर करून असे औषध बनवण्याचा परवाना प्राप्त करून घ्यावा लागतो व संबंधित औषधाची प्रत्येक बॅच तयार झाल्यानंतर ते औषध या मानकांची पूर्तता करत असल्याची खातरजमा करावी लागते.

भेसळयुक्त, बनावट व मिसब्रॅण्डेड आयुर्वेदिक औषध

खरेदी केलेल्या आयुर्वेदिक औषधाच्या गुणवत्तेविषयी शंका येत असेल अथवा खरेदी केलेले औषध क्षतिग्रस्त अथवा बुरशी लागून वा कीड लागून दूषित झालेले असेल तर अशा औषधाला औषध प्रसाधन अधिनियमाच्या कलम ३३ ईई अन्वये ॲडल्टरेटेड म्हणजे भेसळयुक्त औषध संबोधले जाते.

त्याचप्रमाणे एखाद्या प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधाच्या नावाची, स्वरूपाची नक्कल करून एखादे औषध विकले जात असेल तर कलम ३३ ईईए अन्वये त्याला स्पुरियस म्हणजे बनावट औषध म्हटले जाते. संहिता ग्रंथामधील उल्लेखित औषधांच्या घटक द्रव्यांमध्ये अंशतः ही बदल केल्यास त्या औषधांसाठी संहितोक्त नाव अथवा त्याला साधर्म्य दर्शवणारे नाव देऊन ते विक्रीसाठी बाजारात ठेवता येत नाही. उदा. च्यवनप्राश या प्रसिद्ध संहितोक्त आयुर्वेदिक औषधामध्ये साखरे ऐवजी सॅकरिन, ॲस्पार्टेम यासारखे गोडी निर्माण करणारे कृत्रिम रसायने टाकली असल्यास त्याला 'शुगर फ्री च्यवनप्राश' हे नाव देऊन त्याची विक्री करणे हा दंडनीय अपराध आहे. कारण असे औषध औषध प्रसाधन अधिनियमाच्या कलम ३३ ईईए अन्वये स्पुरियस म्हणजे बनावट औषध ठरते. कलम ३३ ई अन्वये औषधाची खराबी लपवण्यासाठी त्याला रंग वा सुगंध मिसळलेल्या अथवा चुकीचे लेबल लावलेल्या औषधाला 'मिसब्रॅण्डेड' औषध म्हणतात.

नाव तांब्याच्या खनिजाचे, विक्री लोह खनिजयुक्त औषधांची...

आयुर्वेदिक औषधांच्या गुणवत्ता पालनाच्या नियमना संबंधात औषध प्रशासन कसे बेफिकीर आहे, हे दर्शवण्यासाठी सुवर्णमाक्षिक भस्म या वैद्यवर्गामध्ये सुपरिचित आयुर्वेदिक औषधाचे एक उदाहरण पुरेसे आहे. सुवर्णमाक्षिक हे कॉपर पायराइट नावाचे तांब्याचे खनिज आहे. यामध्ये सामान्यतः ३५ टक्के तांबे आणि ३० टक्के लोह असते. आयुर्वेदिक फार्माकोपियातील सुवर्णमाक्षिकाच्या मोनोग्राफमध्ये निर्देशित मानकाप्रमाणे यात कमीत कमी ५ टक्के तांबे आणि २० टक्के लोह असणे आवश्यक आहे. नुकत्याच केलेल्या एका अभ्यासामध्ये बाजारातील सुवर्णमाक्षिक भस्माच्या ७ नमुन्यापैकी ६ नमुन्यामध्ये तांब्याचा अंशही सापडलेला नाही.

म्हणजेच, कॉपर पायराइटपासून बनवलेले औषध असे लेबल लावून आयर्न पायराइट या लोह खनिजाचे औषध विकले जात आहे. औषध प्रसाधन अधिनियमाच्या कलम ३३ ईईए अन्वये हे स्पुरियस म्हणजे बनावट औषध आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध होऊन ६ महिने होऊन गेलेत तरी आजही बाजारात असेच तांबे विरहित सुवर्णमाक्षिक भस्म विकले जात आहे व ते आमचे वैद्य बंधू नियमितपणे वापरत आहेत. याच प्रकारे हिऱ्याचे भस्म म्हणून काचेपासून बनवलेल्या भस्माची विक्री केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. याचा अर्थ, सर्वच आयुर्वेदिक निर्माते अशा प्रकारात सामील आहेत असे नाही. काही आयुर्वेदिक औषध निर्माते वर्षानुवर्षे गुणवत्तापूर्ण औषध निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. पण तरीही बनावट औषधी निर्मितीचे असे प्रकार वारंवार घडत आहेत हे निश्चित. औषध प्रशासनाला मात्र या प्रकारांची काही खबर लागत नाही आणि फिकीर तर अजिबातच नाही. मिसब्रॅण्डेड, ॲडल्टरेटेड किंवा स्पुरियस औषध विक्रीसाठी ठेवणे हा दंडनीय अपराध आहे. औषध निरिक्षकांनी याबाबत सातत्याने लक्ष द्यायला हवे. पण असे होताना कधी दिसत नाही. विशेष करून अनेक स्पुरियस आयुर्वेदिक औषधांची बाजारात उघड उघड विक्री होताना दिसत असते. त्याचमुळे बाजारातून आयुर्वेदिक औषध विकत घेताना ग्राहकांनी या सर्व गोष्टी पाहून घेणे आवश्यक आहे. असे काही आढळून आल्यास त्याची तक्रार औषध नियंत्रकाकडे करता येते. याबाबत ग्राहक मंचादी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा.

आयुर्वेदिक औषधांपासून काही हानी होत नाही समाजाच्या अशा दृढ समजामुळे या संबंधांत जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने फोल ठरत आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य औषध नियंत्रण प्रशासनाची जबाबदारी खूप वाढलेली आहे. ती ते प्रशासन ओळखेल तो सुदिन लवकर उजाडावा, अशी आपण आशा करू या.

लेखक परिचय: डॉ. श्रीराम सावरीकर हे एम. डी. (आयु), पीएच. डी. असून, आयुर्वेद प्राध्यापक तसेच गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू, भारत सरकारचे माजी आयुर्वेद सल्लागार आणि भारत सरकारच्या आयुर्वेद फार्माकोपिया समितीचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. त्यांची रसचंडांशु हिन्दी टीका, शारंगधर संहिता इंग्रजी टीका तीन खंड, अर्वाचीन आयुर्वेदायन, आयुर्वेद फाउंडेशन ऑफ हेल्दी लाइफ (इंग्रजी), वैद्यकीय सांख्यिकी शास्त्र (हिंदी) आदी साहित्य प्रकाशित झाले आहे.
संपर्क: sssavrikar@gmail.com | साभार: समतावादी मुक्त संवाद पत्रिका (जुलै २०२६)

Share this article:
Back to Articles