WhatsApp

इन्स्टंट जीवनात आयुर्वेद कालबाह्य झाला आहे?

February 01, 2026
Share:

"आयुर्वेद हे हजारो वर्षापूर्वीपासून प्रचलित भारतीय वैद्यकशास्त्र आहे. हे केवळ वैद्यकशास्त्र नसून ती एक जीवनशैली आहे असे म्हटले जाते."

आयुः रंग

आयुर्वेद हे हजारो वर्षापूर्वीपासून प्रचलित भारतीय वैद्यकशास्त्र आहे. हे केवळ वैद्यकशास्त्र नसून ती एक जीवनशैली आहे असे म्हटले जाते. पण ही जीवनशैली आजच्या शहरी जीवनात उपयोगी आहे काय किंवा तिचे पालन करता येईल काय असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनांत निर्माण होत असतो. सकृतद्दर्शनी हा प्रश्न गैरलागू नाही. कारण आयुर्वेद प्राचीन शास्त्र असल्यामुळे त्यात वर्णित जीवनशैली त्याच प्राचीन समाज जीवनासाठी समयोचित असेल, आजचे समाज जीवन पूर्णतः बदललेले आहे. विद्युत उर्जेने आज रात्रीचा दिवस झाल्यामुळे आजचे दिवस रात्रीचे वेळापत्रकच पूर्णपणे बदलले आहे. अशा बदललेल्या वेळापत्रकाच्या गणितात समाज मनातील आयुर्वेद जीवनशैली बसण्यासारखी नाही म्हणून ती आचरणयोग्य नाही, असे वाटणे साहजिकच आहे. परंतु वास्तवात आयुर्वेदाच्या जीवनशैलीमधील दिनचर्येचे वेळापत्रक कालानुरूप स्वरूप धारण करू शकणारे आहे. पण त्यासाठी या जीवनशैलीतील निरोगी आयुष्याचे सूत्र समजणे आवश्यक आहे. हेच सूत्र समजवण्याचा प्रयत्न या लेखमालेतून करण्यात येणार आहे...

चिकित्सा शास्त्राची सुरूवात मंत्रयुगाने होऊन आज त्याने तंत्रयुगात प्रवेश केला आहे. या तंत्रयुगामध्ये एकीकडे जिवाणू संसर्गजन्य व्याधींची जागा सुखासीन आहार आणि जीवन शैलीशी संबंधित रोगांनी घेतली आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढल्यामुळे जीर्ण व्याधींचे प्रमाण वाढलेले दिसते आहे. संसर्गजन्य रोग सामान्यतः प्रतिजैविकादि औषधे सेवन करून काही दिवसात बरे होणारे असतात. बिघडलेल्या आहार व जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधीने एकदा शरीरांत प्रवेश केला, की तो त्या शरीराची साथ त्याच्या मृत्यूबरोबरच सोडतो. हे रोग कोणत्याच औषधाला जुमानत नाहीत. बिघडलेली आहार व जीवनशैली सुधारून ती रूळावर आणणे, हा त्यावरील मूळ उपाय आहे. पण आधुनिक वैद्यक शास्त्राच्या चिकित्सा सूत्रांत औषधाशिवाय अन्य उपायांना अत्यंत गौण स्थान आहे. या उलट आहार आणि जीवनशैली चिकित्सा हे आयुर्वेद चिकित्सासूत्राचे बलस्थान आहे. अशा प्रसंगी आयुर्वेद उपचारपद्धती योग्य रीतीने वापरल्यास काही प्रसंगी समर्थ पर्याय, तर नेहमीच पूरक चिकित्सा सिद्ध होऊ शकते. हे निश्चित.

कुरूक्षेत्राच्या युद्धभूमीवर श्रीकृष्णाने स्वतःचे तोंड उघडून त्यात अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवले होते, असे म्हटले जाते. हजारो वर्षापूर्वीच्या महाभारत कालातील हा प्रसंग आहे. लौकिकार्थाने विश्वरूप दर्शन दर्शनासाठी आज आपल्याला कुणा भगवान श्रीकृष्णाची गरज पडत नाही. संगणकाचे सामान्य ज्ञान असलेला कुणीही ऐरागैरा माणूस क्लिक करून त्याच्या हातातील मोबाइलच्या स्क्रीनवर जिथे असेल, तिथून इंटरनेटचे दार उघडून संपूर्ण जग काही क्षणांत पाहू शकतो. अशा या झटपट इन्स्टंट युगात आयुर्वेद कालबाह्य झाला आहे, असे मानणारा ज्याला सर्वार्थान सूज्ञ म्हणावे असा एक मोठा वर्ग आहे. त्यातच एकीकडे आयुर्वेदिक औषधाला साइड इफेक्ट्स नसतात. तर दुसरीकडे आयुर्वेदिक औषधांमध्ये मर्क्युरी, लेड, कॅडमियमसारखे टॉक्सिक मेटल्स असतात, त्यामुळे त्यांच्या सेवनामुळे किडनी, लिवर खराब होते. आयुर्वेदिक औषध दीर्घकाल सेवन करावे लागते. त्याने रोग लवकर बरे होत नाहीत. त्यासाठी खूप पथ्यपाणी करावे लागते. यासारखे अनेक समज लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत.

यातील काही प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर तर मोठ्या प्रमाणातील समज ऐकीव माहितीवर आधारित आहेत. उपरोक्त आयुर्वेदाला कायदेशीर मान्यता आहे. २०२५ अखेरीस भारतात सात लाखापेक्षा अधिक नोंदणीकृत आयुर्वेद व्यावसायिक कार्यरत आहेत. यातील दीड लाख व्यावसायिक महाराष्ट्रात आहेत. या तथ्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे या लाखो आयुर्वेद पदवीधरांकडून आयुर्वेद उपचार करून घ्यावेत की नाही आणि घ्यायचे असतील तर ते कोणत्या परिस्थितीत असे प्रश्न समाजाला पडणे साहजिक आहे. या प्रश्नाचे उत्तर देणे हेच या लेखाचे प्रयोजन आहे. गोष्टी खऱ्याखोट्या कशाही असल्या तरी आज भारतात व्याधी प्रादुर्भावाचा बदललेला कल

व्याधी प्रादुर्भावाचा बदललेला कल

आज संपूर्ण जगातील व्याधी प्रादुर्भावाचा कल म्हणजेच डिसिज बर्डन ट्रेंड पूर्णपणे बदललेला दिसून येत आहे. आरोग्य सेवांची वाढलेली व्याप्ती तसेच प्रतिजैविके म्हणजे अँटि बायोटिक्सच्या सहज वापरामुळे आज सांसर्गिक रोगांचा प्रादुर्भाव नष्ट नाही, तरी खूपच कमी झाला आहे. त्यामुळे सांसर्गिक रोग ही काही आता समस्या राहिलेली नाही. दुसरीकडे देशातील अतिदुर्गम भागांत कुपोषणजन्य विकार काही प्रमाणात दिसत असले तरी शहरी जीवनात मात्र ओव्हर न्यूट्रिशन म्हणजे अतिपोषणाच्या परिणामी अतिस्थौल्य म्हणजे ओबेसिटी, मधुमेह, हृदय रोग, रक्तदाब वृद्धी, मेटॅबॉलिक सिण्ड्रोम, ऑटो इम्युन डिसिज यासारख्या आयुर्वेदाच्या भाषेतील संतर्पणजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून तो दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर चाललेला दिसून येत आहे. त्याचे कारण, या प्रकारचे रोग पूर्ण बरे करू शकेल असे कोणतेही औषध आजच्या लोकमान्य अॅलोपॅथी चिकित्सा पद्धतीकडे उपलब्ध नाही. खरे तर ज्याला व्यावहारिक भाषेत टॅबलेट, कॅप्सूल, इंजेक्शन यासारखे औषध म्हटले जाते, ते असे रोग बरे करणारे औषध कुठल्याच चिकित्सा पद्धतीकडे नाही. या व्यतिरिक्त इतर उपचारांना आपला समाज औषध मानत नाही. किंबहुना, जगद्व्याळ पसरलेला बलाढ्य औषधी उद्योग त्याला तसे करू देत नाही. हा औषधी उद्योग अशा रोग्यांना रोज नवीन नवीन निरूपयोगी महागड्या औषधांच्या मात्रा घेण्यास भाग पाडत असतो. या बहुमोल कार्यामध्ये विविध प्रकारच्या विषय तज्ज्ञांची फौज त्यांना मदत करण्यास तत्पर असतेच. वास्तविक बिघडलेली आहार व जीवनशैली सुधारून ती रूळावर आणणे हा त्यावरील मूळ उपाय आहे. पण आधुनिक वैद्यक शास्त्राच्या चिकित्सा सूत्रांत औषधाशिवाय अन्य उपायांना अत्यंत गौण स्थान आहे.

या परिस्थितीत आयुर्वेद हा अत्यंत समर्थ पर्याय होऊ शकतो. पण त्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञांनी आधुनिक औषधांना पर्यायी आयुर्वेदिक औषध देण्यापेक्षा औषध योजनेपलीकडील आयुर्वेदाच्या उपचार पद्धतींचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

आयुर्वेदिक औषध पर्यायी औषध नाही

कोणत्याही आधुनिक औषधाला आयुर्वेदिक औषध पर्याय होऊ शकत नाही. पण संपूर्ण आयुर्वेद उपचार पद्धती योग्य रीतीने वापरल्यास काही प्रसंगी समर्थ पर्याय तर नेहमीच पूरक चिकित्सा सिद्ध होऊ शकते, हे निश्चित. आयुर्वेद चिकित्सापद्धती नव्हे तर जीवनपद्धती आहे अशी धारणा प्रचलित आहे. आयुर्वेदिक जीवन पद्धती म्हटले, की सामान्यतः भल्या पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठणे आणि सद्यकाली आचरणास अव्यावहारिक वाटणाऱ्या इतर गोष्टी आठवतात. परंतु, आयुर्वेदोक्त दिनक्रमांच्या या वेळांची सद्यकालीन असंगतता बघण्यापेक्षा त्यामागील आरोग्य रक्षणाचे मूळ सूत्र लक्षात घेतले गेले पाहिजे. या दृष्टीने केवळ पहाटे उठणे आणि रात्री लवकर झोपणे, म्हणजे आयुर्वेद जीवन पद्धती नव्हे. तर आपल्या व्यावसायिक कार्यवेळांना अनुरूप दिनचर्या योजून आपला आहार आणि विहार म्हणजे इतर दिनक्रम आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यास पूरक व पोषक राहील, असा ठेवणे म्हणजेच आयुर्वेद जीवन पद्धती आचरणे होय. यासाठी आयुर्वेदोक्त आहार सेवनाचे नियम जे अत्यंत वैज्ञानिक आणि आजच्या शहरी जीवनांतही सहज आचरण योग्य आहेत. त्यांचे एक उदाहरण मार्गदर्शक ठरेल.

या आहार सेवन नियमामध्ये संबंधित व्यक्तीची शारीरिक व मानसिक अवस्था, त्याच्या पचन संस्थेची भोजन समयीची स्थिती, त्याच्या एकंदरीत शरीरातील चयापचयादि प्रक्रिया, त्याच्या शरीराची ठेवण इत्यादिना अनुरूप आहारातील घटकांची आवश्यकता यांचा विचार केला जातो. याशिवाय भोजन समयी भोजन करणाऱ्या आणि अन्न वाढणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेसह त्याने पाळावयाचे स्वच्छतेचे बारीक-सारीक नियम ज्यात भोजन पात्रांची स्वच्छता आणि भोजनसमयीचे सभोवताल ज्याला इंग्रजीत अँबियन्स म्हणतात, यांचाही समावेश होतो. कोविडच्या प्रादुर्भावापासून हात धुण्याचे महत्त्व आधुनिक वैद्यक शास्त्राला पटून ते लोकांच्या मनावर बिंबवण्याचे भरमार प्रयत्न केले जात आहेत. परिणामी हॅण्ड सॅनिटायजरच्या जाहिरातीतून त्यांची विक्री कैक पटीने वाढून संबंधित उद्योजकांच्या तिजोऱ्या भरल्या जात आहेत. पण हात धुणेच नव्हे तर एकूणच वैयक्तिक स्वच्छतेचे आयुर्वेदाने अधोरेखित केलेले महत्त्व आजही दुर्लक्षितच राहिले आहे.

वास्तविक त्यात अव्यवहार्य असे काही नाही. आमच्या विद्यार्थी दशेत स्वस्थवृत्त विषयातील अशा वर्णनाकडे आम्ही असल्या फुटकळ गोष्टी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना सांगणे हास्यास्पद ठरवून त्याकडे दुर्लक्ष करत होतो. हे आठवले की खजील व्हायला होते. तसे पाहिले तर एकूणच आयुर्वेदाकडे एक विज्ञान म्हणून आम्ही भारतीयांनी दुर्लक्षच केले आहे. समाजमनाने त्याला एक घरगुती उपचार पद्धती किंवा आजीबाईच्या बटव्यातील औषधी एवढीच मान्यता दिली आहे.

आयुर्वेदिक औषधांचा अज्ञानमूलक वापर घातक ठरू शकतो

आजारी पडल्यानंतर ठरवून आयुर्वेदिक उपचार घेणारी व्यक्ती आज भारतातही सापडणे तसे दुर्मीळ म्हटले पाहिजे. सामान्यतः एखादा आजार अॅलोपॅथी औषधाने बरा होत नाही, असे लक्षात येऊ लागले की मग लोकांना आयुर्वेदिक औषधाची आठवण येते. त्यातही आयुर्वेदिक उपचार घेतल्याने रोग बरा होईल या विश्वासापेक्षा हेही करून पाहू अशी भावना अधिक असते. म्हणूनच कॅन्सर, डायबेटिस, ओबेसिटी, सांधेदुखी, वंध्यत्व, पांढरे डाग, सोरियासिस सारखे त्वचा रोग, ऑटोइम्युन डिसिजेस यासारखे कधीही बरे न होणारे रोग बरे व्हावेत या आशेने लोक आयुर्वेदाकडे वळत असलेले दिसतात. असे उपचार घेतानाही आयुर्वेदाचा उपयोग पूरक उपचार म्हणूनच अधिकतर केला जात असतो. म्हणजे यातील बहुसंख्य लोक अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक अशी दोन्ही औषधे एकाच वेळी घेत असलेले आढळून येतात. बरे असे करत असल्याची माहिती त्यांच्या डॉक्टरलाही ते क्वचितच देत असतात. अशा प्रसंगी अनेकदा एकच कार्य करणारी आयुर्वेदिक आणि अॅलोपॅथिक औषधे एकत्र घेतली जात असतात. त्यामुळे कधी कधी त्यांच्या एकत्रित परिणामामुळे रूग्णाची प्रकृती अचानक बिघडते. उदा. डायबेटिसमध्ये रक्त शर्करेचे प्रमाण कमी करणाऱ्या औषधाबरोबर आयुर्वेदिक औषध घेतल्यास कधी कधी रक्त शर्करा अचानक कमी होऊन रूग्णाला धोका होऊ शकतो.

या उलट परस्पर विरूद्ध कार्य करणारी अॅलोपॅथिक व आयुर्वेदिक औषधे एकत्र दिली गेल्यास त्यांची परिणामकारकता थांबवली जाऊन परिणामी रोग बळावून आत्ययिक अवस्था निर्माण होऊ शकते. उदा. इपिलेप्सी, म्हणजे अपस्मारासारख्या विकारांत आक्षेप प्रतिरोधक अॅलोपॅथिक औषधांबरोबर जटामांसीसारखे औषध दिल्यास अॅलोपॅथिक औषधाची आक्षेप प्रतिरोध क्षमता कमी होऊन अपस्माराचे आक्षेप अचानक सुरू होण्याची शक्यता असते. असे काही घडले, की संबंधित अॅलोपॅथिक डॉक्टर लगेचच घडलेल्या दुर्घटनेसाठी आयुर्वेदिक औषधाला जबाबदार ठरवून संपूर्ण आयुर्वेदाला दूषणे देऊ लागतो. मग संबंधित दुर्घटनेचे बळी आणि साक्षीदार हे सर्व लोक आयुर्वेदाचे कट्टर विरोधक बनतात. वास्तविक घडलेली घटना ड्रग इंटरअॅक्शन म्हणजे औषधांच्या परस्परपूरक अथवा प्रतिबंधक क्रियेमुळे घडलेली असते. अशा वेळी अशा शक्यता विचारात घेऊनच संबंधित चिकित्सकाने औषधाचे प्रमाण कमी जास्त करावयाचे असते. पण अशा प्रकारच्या क्रियांचे रूग्णाला सोडा पण डॉक्टरांना सुद्धा अपवादानेच ज्ञान असते. अशा अज्ञानाचे एकमेव कारण आयुर्वेदिक औषधे निरूपद्रवी असतात, हा सार्वत्रिक दृढ गैरसमज.

कॅन्सर आणि आयुर्वेद

कधीही बरे न होणारे रोग म्हणून ज्या रोगांचा वरती उल्लेख केला आहे, त्यात कॅन्सरच्या चिकित्सेसाठी आयुर्वेदाकडे वळलेल्या लोकांची संख्या लक्षणीय असते. कॅन्सर चिकित्सा कितीही सुधारलेली असली, तरी काही निवडक प्रकार वगळता इतर प्रकारचे कॅन्सर बरे होण्यातले नाहीत. त्यामुळे जवळपास प्रत्येक कॅन्सरचा रूग्ण चिकित्सेच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर कुठल्या ना कुठल्या आयुर्वेद डॉक्टरला भेट देतोच देतो. अशा रूग्णांना भ्रमित करण्यात कॅन्सर बरे करण्याची हमी देणाऱ्या बेकायदेशीर भडक जाहिराती, मित्रमंडळी आणि सग्यासोयऱ्यांचे अनाहूत सल्ले आणि समाज माध्यमावरून प्रसारित होणाऱ्या फुकट सल्ल्यांचा हमखास हातभार लागतो. अशा वेळी तो रूग्ण आयुर्वेदाबरोबरच अॅलोपॅथीचेही कॅन्सरचे सखोल ज्ञान बाळगणाऱ्या आयुर्वेद डॉक्टरकडे पोहोचला असेल, तर त्याचे नशीब. अन्यथा त्याच्या पदरी निराशा येणे ठरलेलेच आहे. अशा प्रकारचे ज्ञान बाळगणारे आयुर्वेद तज्ज्ञ संख्येने कमी असले, तरी नक्की उपलब्ध आहेत. वास्तविक कॅन्सरच्या चिकित्सेसाठी चिकित्सेच्या कोणत्याही टप्प्यावर आयुर्वेद डॉक्टरकडे जाताना रूग्णांनी व त्या रूग्णांची चिकित्सा करणाऱ्या आयुर्वेद डॉक्टरांनी अपवाद वगळता हा रोग कधीही बरा होणारा नाही, हे लक्षात ठेवलेच पाहिजे.

अशा वेळी आयुर्वेद डॉक्टरांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. आयुर्वेद डॉक्टरांनी कॅन्सर रुग्णाची चिकित्सा करताना तो बरा होणारा नाही, हे रूग्णाला स्पष्टपणे सांगणे आवश्यक असते. या बाबतीत अॅलोपॅथिक कॅन्सर तज्ज्ञांचा आदर्श आयुर्वेद डॉक्टरांनी समोर ठेवायला हवा. कोणताही अॅलोपॅथिक कॅन्सर तज्ज्ञ कॅन्सर रुग्णाला कॅन्सर त्याचे शरीर पूर्णपणे सोडून जाईल व तो खडखडीत बरा होईल, असे कधीच सांगत नाही. उलट विशिष्ट प्रकारची चिकित्सा घेतल्यास संबंधित रूग्ण अमुक इतके दिवस, महिने वा वर्ष जिवंत राहण्याची अमुक टक्के शक्यता आहे, असे तो सांगत असतो. त्याचबरोबर कोणत्या प्रकारची चिकित्सा घेतल्यास किती खर्च येईल याचीही स्पष्ट कल्पना रूग्णाला दिली जात असते. सामान्यतः कॅन्सरची चिकित्सा करताना रूग्णाचे उरलेले आयुष्य कमीत कमी वेदनादायी व शक्य तितके सुसह्य होईल, याचाच प्रयत्न कॅन्सर चिकित्सक तज्ज्ञ करीत असतात. कॅन्सर रूग्णाची चिकित्सा करणाऱ्या प्रत्येक आयुर्वेद डॉक्टरचीही हीच भूमिका असली पाहिजे. परंतु असे अभावानेच होताना आढळते. कॅन्सरग्रस्त रूग्णांना आयुर्वेदिक औषधांनी तो कॅन्सरमुक्त होईल, या भ्रमात ठेवण्याच्या घटनांचे प्रमाण चिंताजनक आहे. अनेकदा या भ्रमाच्या पडद्याखाली अत्यंत महागडी औषधे भरमसाट फी आकारून रूग्णांच्या गळ्यात मारली जात असतात. अशा प्रकारच्या औषधांची परिणामकारकता वैज्ञानिकदृष्ट्या सिद्धही झालेली नसते. तसेच आयुर्वेद तज्ज्ञ ज्यांना प्रमाण मानतात, त्या संहिता ग्रंथातही तसा काही ठोस उल्लेख असत नाही. त्यातच सामान्यतः कॅन्सरमध्ये यकृताची कार्यक्षमता बऱ्याच प्रमाणात कमी झालेली असते.

अशा अवस्थेत कॅन्सरमध्ये यकृताच्या कार्यक्षमतेवर अवलंबित औषधांचा वापर शक्यतो टाळला वा कमी केला जात असतो. अशा अवस्थेत शरीरातील औषधी कार्यासाठी आणि त्यांच्या निष्कासनासाठी यकृतावलंबी औषधे कॅन्सर रूग्णाला धोकादायक ठरून त्याचे आयुष्य अपेक्षेपेक्षा लवकर संपवू शकतात. तरीही आयुर्वेदिक डॉक्टर अशा औषधांच्या कॅन्सर वरील उपयुक्ततेची खात्री देऊन त्याचे गुणगाण गात असलेले दिसून येतात. या गोष्टीचे भान ठेवून कॅन्सरची योग्य आयुर्वेद चिकित्सा करणारे आयुर्वेद तज्ज्ञांचे सन्माननीय अपवाद निश्चितच कार्यरत आहेत. कॅन्सर रूग्णांना आयुर्वेदिक औषधांनी कॅन्सरमुक्तीची फसवी स्वप्ने दाखवणाऱ्या पानभर पसरलेल्या जाहिराती नामांकित दैनिकातून हल्ली नियमितपणे पाहायला मिळत आहेत. वास्तविक अशा प्रकारच्या जाहिराती करणे वैद्यकीय आचार संहितेचा भंग करणारे आहे. या आचार संहिता भंगावर संबंधित वैद्यकीय परिषदा कायदेशीर कारवाई करू शकतात. पण या परिषदांकडून अशा प्रकारची कारवाई झाल्याचे कधी ऐकिवात येत नाही.

आयुर्वेद व अॅलोपॅथिक तज्ज्ञांचा समन्वय आदर्श परिस्थिती

कॅन्सर रूग्णाची चिकित्सा अॅलोपॅथिक व आयुर्वेद तज्ज्ञांनी एकत्र येऊन करणे ही आदर्श परिस्थिती आहे. पण अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी उभयतांमध्ये विश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. आजच्या परिस्थितीमध्ये अॅलोपॅथिक तज्ज्ञाकडे आयुर्वेदाचे प्राथमिक ज्ञानही असण्याची अपेक्षा बाळगणे, हे स्वप्नवत आहे. त्यामुळे अॅलोपॅथी तज्ज्ञाने आयुर्वेदाचा टोकाचा विरोध वा द्वेष न करता त्याच्या रूग्णाची चिकित्सा करणाऱ्या आयुर्वेद चिकित्सकावर विश्वास ठेवावा एवढेही पुरेसे आहे. अॅलोपॅथी व आयुर्वेदाच्या सामंजस्यपूर्ण समन्वयी आदर्श परिस्थितीमध्ये सहभागी होणाऱ्या आयुर्वेद तज्ज्ञाची जबाबदारी मात्र खूपच वाढलेली असते. अशा वेळी त्याच्याकडे कॅन्सर या रोगाचे अॅलोपॅथीचे अद्ययावत ज्ञान असणे ही मूलभूत गरज आहे. तसेच जी आयुर्वेदिक औषधे देण्याचे योजले जात आहे, त्याची अॅलोपॅथी तज्ज्ञाला त्याला समजेल, त्या भाषेमध्ये योग्य ती माहिती आयुर्वेद तज्ज्ञाने करून देणेही आवश्यक असते. असे झाले की कॅन्सर रुग्णाला त्याचा निश्चितपणे फायदा मिळू लागतो. अशी परिस्थिती हल्ली काही रूग्णालयांत पाहायला मिळते आहे. तिचे अतिशय उत्साहवर्धक परिणामही पाहायला मिळू लागले आहेत.

कॅन्सर वा अन्य कोणत्याही व्याधीने पीडित रूग्ण जेव्हा अॅलोपॅथी औषधासोबतच आयुर्वेदिक औषध घेत असतात, तेव्हा अशा औषधांविषयीची त्यांच्या अॅलोपॅथी आणि आयुर्वेद चिकित्सकांची अनभिज्ञता आणि अज्ञान संबंधित रूग्णासाठी घातकच ठरत असते. अॅलोपॅथी व आयुर्वेद औषधे एकत्र घेणाऱ्या बहुसंख्य रूग्णाबाबतीत आज नेमके हेच दिसून येत आहे. त्यामुळे आयुर्वेद चिकित्सा घेऊ इच्छिणाऱ्या अशा रूग्णांनी त्यांच्या अॅलोपॅथी डॉक्टरला याबाबत अंधारात ठेवता कामा नये. त्याचप्रमाणे अशा रूग्णांची चिकित्सा करणाऱ्या आयुर्वेद डॉक्टरांनीही स्वतः पुढाकार घेऊन संबंधित रूग्णाची चिकित्सा करणाऱ्या अॅलोपॅथी तज्ज्ञाशी संपर्क साधून समन्वयाने चिकित्सा योजना करणे आवश्यक आहे. संबंधित अॅलोपॅथी तज्ज्ञानेही अहंकार बाजूला ठेऊन याबाबत सहकार्याची भावना ठेवणे, अंतिमतः रूग्णाच्या हिताचे ठरेल. अखेरीस रूग्णहित हेच वैद्यकीय व्यवसायाचे ध्येय असले पाहिजे, मग ते कुठल्या चिकित्सा पद्धतीने साधले जाते ही बाब गौण आहे.


डॉ. श्रीराम सावरीकर हे एम. डी. (आयु), पीएच. डी. असून, आयुर्वेद प्राध्यापक तसेच गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू, भारत सरकारचे माजी आयुर्वेद सल्लागार आणि भारत सरकारच्या आयुर्वेद फार्माकोपिया समितीचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. त्यांची रसचंडांशु हिन्दी टीका, शारंगधर संहिता इंग्रजी टीका तीन खंड, अर्वाचीन आयुर्वेदायन, आयुर्वेद फाउंडेशन ऑफ हेल्दी लाइफ, इंग्रजी, वैद्यकीय सांख्यिकी शास्त्र- हिंदी आदी साहित्य प्रकाशित झाले आहे.
संपर्क: sssavrikar@gmail.com

Share this article:
Back to Articles