औषधेतर चिकित्सा योजना हेच आयुर्वेदाचे बलस्थान
डॉ. श्रीराम सावरीकर
आयुः रंग
मागील लेखांत आपण शहरी जीवनातील आयुर्वेदाच्या उपयुक्ततेबद्दल माहिती घेतली. त्यात आपण आयुर्वेदोक्त जीवनशैली कालानुरूप कशा प्रकारे उपयोगात आणता येईल याचा विचार केला होता. वैद्यकीय व्यवसाय आणि औषधी उद्योगाच्या व्यापारीकरणाच्या परिणामी जगभरातील लोक अधिकाधिक औषधावलंबी बनत चालले आहेत. अशा परिस्थितीमध्ये औषधेतर चिकित्सा योजनेस प्राधान्य असलेली आयुर्वेद चिकित्सा पद्धती अत्यंत उपयुक्त सिद्ध होऊ शकते. याचे विवेचन करणारा आयुः रंग लेखमालेतील हा तिसरा लेख...
मेडिकलायझेशन ऑफ लाइफ
काही दिवसांपूर्वी इव्हान इलिच या लेखकाचे 'मेडिकल नेमेसिस' हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले. इव्हान इलिचने वैद्यकीय क्षेत्राच्या समाज जीवनावरील प्रभाबाचे वर्णन करताना 'मेडिकलायझेशन ऑफ लाइफ' असा एक शब्दप्रयोग केला आहे. इथे इलिचच्या पुस्तकाच्या विषयासंदर्भात मेडिकलायझेशनचा अर्थ वैद्यकीय उपचारीकरण किंवा प्रामुख्याने औषधीकरण असा आहे. माणसाच्या आयुष्याचे आज औषधीकरण झाले आहे, असे इलिच म्हणतो. याचा अर्थ, शरीराला जरा काही झाले की त्यावर आम्ही लगेच औषधी उपचार शोधू लागतो. शरीराची बिघडलेली यंत्रणा नैसर्गिकरित्या रूळावर येण्यासाठी आम्ही वेळच देत नाही. त्यातच हल्ली वैद्यकीय क्षेत्रात दिवसागणिक नवीन नवीन औषधांचा जणू रतीबच घातला जात आहे. बरे, नवीन औषध येताच पूर्वीचे औषध लगेचच धोकादायक होते, असेही सांगितले जाते. म्हणजे, कालपर्यंत शरीरासाठी जे उपकारक होते, ते आज एकदम धोकादायक बनते. वैद्यकीय क्षेत्रातील या अशा घटनांमुळे लोकांची स्वयं स्वस्थीकरणाची जन्मजात क्षमता टिकण्यासाठीचे आवश्यक नैसर्गिक आणि सांस्कृतिक बातावरण धोक्यात आले आहे.
वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीमुळे विषेशतः प्रतिजैविक औषधांच्या शोधामुळे क्षयरोग, कॉलरा, प्लेग, मलेरिया यासारख्या साथीच्या रोगांवर मात करून मानवाचे आयुर्मान वाढले आहे, असा दावा केला जातो. या दाव्याविषयी संशय घेण्याजागी परिस्थिती दुर्लक्षिण्यासारखी नाही. औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या काळात दोन पिढ्यापर्यंत क्षयरोगाचा कहर शिखरावर पोहोचलेला होता. सन १८१२ मध्ये न्यूयॉर्क शहरात क्षयरोगग्रस्त लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण ७०० प्रति १०,००० होते. १८१२ मध्ये रॉबर्ट कोचने क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावला, तोपर्यंत हे प्रमाण ३७० प्रति १०,००० इतके खाली उतरले होते. पुढे १९१० मध्ये क्षयरोग्यांसाठीचे पहिले सॅनिटोरियम उघडले, तोपर्यंत ते प्रमाण १८० प्रति १०,००० पर्यंत नैसर्गिकरीत्या घटले होते. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर प्रतिजैविकांचा शोध लागून त्याचा वापर सुरू होण्यापूर्वी हा क्षयरोग्यांचा मृत्यूदर ४८ प्रति १०,००० पर्यंत घटला होता.
हीच गोष्ट कॉलरा, अतिसार, टायफाइड यासारख्या सांसर्गिक रोगांच्या बाबतही दिसून येते. या रोगांची कारणे
समजून त्यावर नेमके औषध मिळेपर्यंत या रोगांची तीव्रता व प्रादुर्भाव कमी होऊन त्यांचे सामाजिक महत्त्व लक्षणीयरीत्या कमी झाले होते. डिप्थेरिया, स्कारलेट फिवर, डांग्या खोकला, गोवर, कांजण्या या रोगाने होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण प्रतिजैविकांचा सामान्य वापर सुरू होण्यापूर्वीच आणि सार्वजनिक लसीकरण सुरू होण्यापूर्वी १८६० ते १९६५ या कालांत ९० टक्के कमी झाले होते. एकूणच राहणीमानातील सुधारणा, सूक्ष्म जीवाणू संसर्गाच्या तीव्रतेतील नैसर्गिक घट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आहाराच्या पोषण मूल्याची वृद्धी या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे लोकांची वाढलेली रोगप्रतिकारक शक्ती सांसर्गिक रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूद्रांमध्ये लक्षणीय घट दर्शवू लागली होती. आजही प्रतिजैविकादी औषधांची विपुल उपलब्धता असूनही जगातील कुपोषणग्रस्त अविकसित देशामधील लोकांमध्ये अतिसार, न्युमोनिया आणि श्वासनलिकेचे संसर्गजन्य विकार इत्यादींचे प्रमाण अधिक असून, हे दीर्घकाळापर्यंत बरे होत नाहीत, तसेच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही खूप जास्त आहे, असे दिसून येते. याचाच अर्थ, औषधांमुळे नव्हे तर सुधारलेल्या राहणीमानामुळे सांसर्गिक रोगांचे प्रमाण कमी होऊन लोकांचे आयुर्मान वाढलेले आहे.
असांसर्गिक रोगांचा वाढता प्रादुर्भाव
एकीकडे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण आज जगभरांत कमी झालेले असताना दुसरीकडे मात्र डायबेटिस, उच्च रक्तदाब, हृदय रोग, लठ्ठपणा, कॅन्सर, सांधेदुखी, मानसिक नैराश्य यासारख्या असांसर्गिक रोगांनी साथीच्या रोगांच्या प्रादुर्भावाचे रूप धारण केले आहे. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, हे रोग कोणत्याही औषधाने बरे होणारे नाहीत. तरीही वैद्यकीय जगत ते बरे करण्यासाठी लोकांवर रोज नवीन नवीन औषधांचा सातत्याने मारा करीत आहे. सांसर्गिक रोगांचा प्रादुर्भाव व तीव्रता कमी होण्याचे श्रेय जसे वैद्यक शास्त्राला देता येत नाही, तसेच आजच्या असांसर्गिक रोगांच्या चढत्या आलेखालाही वैद्यकीय क्षेत्र जबाबदार नाही. ही वाढ सार्वत्रिक यांत्रिकीकरणामुळे कमी झालेले शारीरिक कष्ट, वाढलेले आयुर्मान आणि पोषक द्रव्यांच्या असंतुलित सेवनामुळे झालेली आहे. यावर औषधी उपचार नव्हे, तर योग्य प्रकारचा व्यायाम आणि संतुलित आहार यावर आधारित उपचार आवश्यक आहेत. सामान्यतः व्यक्तिपरत्वे आवश्यक पोषक तत्त्वे आणि
आयुर्वेद ही मूलतः औषध विरहित चिकित्सा पद्धती आहे. आहार-विहारातली शिस्त या चिकित्सापद्धतीत केंद्रस्थानी आहे...
ठराविक कॅलरीयुक्त अन्न म्हणजे संतुलित आहार आणि ठराविक वेळ फारतर ठराविक कॅलरीज खर्च करणारी शारीरिक हालचाल म्हणजे, योग्य व्यायाम अशी धारणा असते. पण प्रत्यक्षात हे पुरेसे नाही. केवळ पोषक तत्त्वे व कॅलरी यांनी आवश्यक संतुलन साधता येत नाही. विशेषतः रोगनिर्माण व रोगावस्थेमध्ये त्याहूनही अधिक काही लागते. नेमके इथेच आयुर्वेदाचे कार्य सुरू होते.
औषध विरहित उपचार प्रधान चिकित्सा पद्धती
आयुर्वेद ही एक औषध विरहित उपचार प्रधान चिकित्सा पद्धती आहे. आयुर्वेद चिकित्सेमध्ये कोणत्याही रोगाच्या चिकित्सा योजनेमध्ये औषधी उपचारांना शेवटचे स्थान असते. निदान परिवर्जन म्हणजे रोगाच्या कारणांचे निराकरण आणि रोग विरोधी उपाय असे आयुर्वेद चिकित्सेचे दोन प्रकार आहेत. त्यांत निदान परिवर्जनाला म्हणजे निराकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोगाचे कारण तसेच ठेऊन विशिष्ट रोग विरोधी औषधांचा उपयोग अनेकदा अयशस्वी तर काही वेळा क्षणिक उपयोगी ठरत असतो. म्हणूनच रोगाचे कारण शोधून ते नाहीसे करणे नेहमीच अत्यावश्यक ठरते. अपघात वगळता इतर वेळा बिघडलेला आहार आणि एकूणच बिघडलेली जीवनशैली हेच रोगाचे मूळ कारण असते. त्यामुळे आहार आणि जीवनशैली सुधारणे हीच खरी रोग चिकित्सा असते. पण औषधी उद्योगाच्या वैद्यक शास्त्रावरील अतिप्रभावामुळे डॉक्टर आणि रूग्ण दोघेही अति औषधावलंबी झालेले आहेत. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरनेही रोग बरा करण्यासाठी आधुनिक औषधाला पर्यायी आयुर्वेदिक औषध द्यावे, अशी रूग्ण अपेक्षा करीत असतात..
रुग्णाचे समाधान करण्यासाठी अनेकदा आयुर्वेद डॉक्टर
असे औषध देतातही. औषध देताना आयुर्वेदिक डॉक्टर आहार आणि दैनंदिन व्यवहारात पाळावयाच्या आणि टाळावयाच्या काही गोष्टीही सांगत असतात. वास्तविक रोग बरा होण्यासाठी याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. आहाराला तर आयुर्वेदाने महा औषध अशी संज्ञा दिलेली आहे. एकदाही औषध न घेता एखादी व्यक्ती पूर्ण आयुष्य व्यतीत करू शकते. पण आहार सेवन न करता कुणीही जगू शकत नाही. असे असले तरी रूग्णाची मानसिकताच अशी बनलेली असते, की हे तथ्य त्याच्या पचनी कधीच पडत नाही. औषध घेतल्याशिवाय रोग बरा होणारच नाही या भ्रमातच तो कायम राहत असतो. नव्हे वैद्यक व्यवसाय आणि औषधी उद्योगाच्या व्यापारीकरणाने त्याला तसे भ्रमात ठेवलेले असते. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितलेल्या औषधेतर गोष्टीकडे रुग्ण पूर्ण दुर्लक्ष करीत असतो. परिणामी, त्याचा रोग केवळ औषधाने बरा होत नाही आणि त्याचा दोष आयुर्वेदाच्या माथी ठेवला जातो.
आयुर्वेद डॉक्टरने आहार आणि सामान्य व्यवहार या संबंधी रूग्णाला दिलेल्या सूचना या व्यवहार्य नसतात, असे सामान्यपणे म्हटले जाते. पण विशिष्ट परिस्थितीजन्य अनिवार्यतेचा अपवाद वगळता या समजुतीमध्ये फारसे तथ्य नाही. अशा अपवादात्मक परिस्थितीचा आयुर्वेदिक डॉक्टरने विचार करून रुग्णाला योग्य सल्ला देणे आवश्यक असते. बहुसंख्य प्रकरणात आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या अशा अनेक घातक सवयी रूग्णाच्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात, की शक्य असूनही त्या मोडायला सांगणे त्याला अव्यवहार्य वाटू लागते. अगदी साधे उदाहरण द्यायचे, तर एखाद्याला चहा सोडायला सांगितले की त्याला ते अशक्य वाटते. चहा ही काही जीवनाला अत्यावश्यक गोष्ट नाही. पण चहा प्यायल्यामुळे स्वास्थ्य बिघडू शकते, या गोष्टीवर रूग्णाचा विश्वासच बसत नाही.
दूध आणि चयापचयजन्य विकार
दूध हा विषय तर आणखी गंभीर आहे. मधुमेह आणि अतिपोषण (ज्याला असंतुलित पोषण म्हणणे अधिक योग्य) जन्य विकार उदा. चयापचयजन्य विकार (मेटॅबॉलिक डिसऑर्डर) या रोगामध्ये दूध पिणे आरोग्यासाठी हानीकारक आहे. आयुर्वेद ग्रंथामध्ये दुधाचे नित्य सेवन हे मधुमेह आणि स्थौल्य अशा संतर्पणजन्य रोगांचे एक महत्त्वाचे कारण म्हणून नमूद केले आहे. आधुनिक वैद्यक शास्त्रानुसारही बाल्यावस्था
उलटल्यानंतर दूध पचण्यासाठी लागणारे लॅक्टोज या उत्प्रेरकाच्या (एन्झाइम) प्रमाणात ६० ते ७० प्रतिशत घट होत असते. मध्य वय आणि तदनंतर तर हे प्रमाण सातत्याने घटत जात असते. त्यामुळे मध्यवयीन आणि वयस्कर व्यक्तीमध्ये दूध अपाचित राहून (लॅक्टोज इन्टॉलरन्स) तज्जन्य विकार निर्माण होण्याचे प्रमाण खूप अधिक आहे. याच्याच परिणामी डायबेटिस, ओबेसिटी असे चयापचयजन्य विकार उत्पन्न होत असतात. पण आयुर्वेदिक डॉक्टरने दूध घेणे बंद करा, असे सांगितले की मी फार नाही केवळ चहामध्ये थोडेसे दूध घेतो, अशी स्वतःची समजूत करून घेऊन वैद्याच्या सल्ल्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. बास्तविक जे थोडे थोडे दूध रोज घेतले जात असते त्याचे अपाचित घटक शरीरांत साचत जाऊन ते हळूहळू पूर्ण पचनसंस्था बिघडवत असतात, हे कुणी लक्षात घेत नाही. आयुर्वेद डॉक्टर प्रत्येक रोगाच्या चिकित्सेमध्ये आहारामध्ये सेवन करावयाच्या आणि त्याहीपेक्षा टाळावयाच्या पदार्थांबद्दल सूचना देत असतो. त्यात टाळायच्या पदार्थांची संख्या जास्त असते.
आहार सेवनाच्या पद्धती आणि चयापचयजन्य विकार
आजच्या काळात आमच्या आहार सेवनाच्या पद्धती पूर्णपणे बदलून गेल्या आहेत. साधे उदाहरण म्हणजे, पूर्वी हॉटेलच्या खाद्य पदार्थांची जाहिरात 'खास घरच्या चवीचे जेवण' अशी केली जात असे. आता मसाल्यांची जाहिरात हॉटेलच्या जेवणाची चव घरात अनुभवा अशी केली जात आहे. हाय फ्लेमवर दीर्घकाल तळून तयार केलेले पदार्थ ज्यामध्ये अॅडव्हान्स्ड ग्लायसेशन अँड प्रॉडक्ट्स (ए जी ई), अक्रलॅमाइड, ट्रान्स फॅट्स हे आरोग्यास घातक पदार्थ असतात, ते नियमितपणे सेवन केले जात आहेत. आपले जेवणाचे ताटही आता, नको त्या पदार्थांनी भरले जात आहे. आम्ही पाश्चात्याची भोजनशैली अवलंबत आहोत. साधे उदाहरण म्हणजे, पाश्चात्यामध्ये गोड पदार्थ डेजर्ट म्हणून जेवण संपल्यानंतर सेवन केले जातात. भारतीय आहारात गोड पदार्थ जेवताना सुरूवातीसच किंवा अधून मधून सेवन केले जातात. त्याचे साधे वैज्ञानिक कारण गोड पदार्थ पचायला जड असतात. जेवणाच्या सुरुवातीस पोट रिकामे असते, तेव्हा पाचक रस तीव्रतेने स्रवत असतात. त्यामुळे सुरुवातीस सेवन केलेल्या गोड पदार्थांचे पचन सुलभ होते. जेवण संपल्यानंतर पोट भरलेले असते. पाचक स्राव कमी झालेले असतात. त्या भरलेल्या
पोटात वर आपण पचायला जड असे गोड पदार्थ सेवन करतो. हे अपचनाला आणि पुढील दीर्घकालीन विकारांना आमंत्रण देणे नव्हे काय?
जेवताना पाणी प्यावयाच्या चुकीच्या सवयी हा एक असाच दीर्घकालीन दुष्परिणाम करणारा घटक होय. भारतीय जेवणामध्ये पाण्याने भरलेले भांडे जेवण करताना ताटाच्या बाजूस ठेवलेले असे. अन्न सेवन करताना अधूनमधून पाणी पिण्याची पद्धत होती. ज्यामुळे पोटात घन पदार्थ व द्रव पदार्थ यांचे योग्य मिश्रण होऊन योग्य वेळेत पोटातील अन्न पुढे सरकण्याची प्रक्रिया साधली जात असे. हल्ली जेवताना पाणी पिणे पूर्णपणे बंद झाले आहे. जेवताना पाण्याचे भांडे जवळ ठेवणे हल्ली दुर्मिळ झाले आहे. पाण्याचे भांडे जेवणाच्या टेबलपासून दूरवर कुठेतरी ठेवलेले असते. जेवण संपवून जमलेच तर, हात धुतल्यानंतर नाहीतर तसेच मुद्दाम जाऊन पिण्यासाठी पाणी घ्यावे लागते. अनेकदा तर ते प्यायलेच जात नाही. अशा वेळी सेवन केलेले अन्न पदार्थ दीर्घकाळ जठरात पडून राहून अन्न पचन बिघडणार नाही तर काय होणार?
फलाहार आणि चयापचयजन्य विकार
फलाहार हाही असाच एक संवेदनशील विषय आहे. औद्योगिक क्रांतीपूर्वी कुपोषणजन्य आजारांचे प्रमाण खूप अधिक होते. त्यातच 'क' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण विशेषतः खलाशांमध्ये खूप अधिक होते. केवळ स्कर्वीमध्येच नव्हे तर जंतुसंसर्गजन्य आजारामध्येही व्हिटॅमिन्सची कमतरता आढळून येत असे. परिणामी, लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असे. त्यामुळे आजारी माणसाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्याला फळे देण्याची पद्धत सुरू झाली. म्हणूनच आजारी माणसाला भेटायला जाताना फळे घेऊन जाण्याची पद्धत सुरू झाली, जी आजही पाळली जाते. पण आज परिस्थिती बदलली आहे. कुपोषणाजन्य नव्हे तर असंतुलित पोषणजन्य आजार आता वाढले आहेत. अशा आजारी व्यक्तीला फळे देण्याची गरज उरलेली नाही. उलट फळांच्या सेवनामुळे नवीनच समस्या निर्माण होत आहेत. फळामध्ये फ्रुक्टोजच्या रूपांत साखर असते. वैद्यकीय व्यवसायात असे म्हटले जाते की एखादी व्यक्ती सातत्याने अंगदुखी, अस्वस्थ वाटणे, अपचन अशा तक्रारी करत असेल आणि त्या तक्रारींचे कोणतेही कारण डॉक्टरला सापडत नसेल, तर अशा ७० टक्के रुग्णामध्ये
फ्रुक्टोज इन्टॉलरन्स कारणीभूत आहे, असे समजावे. इतके हे प्रमाण वाढले आहे.
फलाहार ही चयापचयजन्य विकारा (मेटॅबॉलिक डिसऑर्डर) मध्ये तर अत्यंत प्रकृतिविघातक अशी गोष्ट आहे. याचे वैज्ञानिक कारणही आहे. फळामधील फ्रुक्टोज आणि इतर खाद्य पदार्थामधून मिळणाऱ्या सुक्रोज, ग्लुकोजच्या चयापचय (मेटॅबॉलिजम) मध्ये मूलभूत फरक आहे. फ्रुक्टोजच्या पचनासाठी इन्सुलिनची गरज नसते. फ्रुक्टोज सेवन केल्यानंतर ते आतड्यातून सरळ यकृतामध्ये जात असते. तिथून फ्रुक्टोजचे पचनोत्तर घटकांत परावर्तन होऊन ते घटक शरीरात पसरतात. त्यामुळे शरीरातील ट्रायग्लिसराइडचे प्रमाण वाढून ते अनेक प्रकारच्या चयापचयाच्या (मेटॅबॉलिक) विकारांना निमंत्रण देणारे ठरते. त्यामुळे फळांचे अधिक प्रमाणातील सेवन आरोग्यास हानीकारक आहे. विशेषतः डायबेटिस, ओबेसिटी व अन्य चयापचयाच्या (मेटॅबॉलिक) विकारामध्ये तर ते प्रकृतिघातक ठरू शकते.
आहार विहाराधारित चिकित्सा योजना आयुर्वेदाचे बलस्थान
आयुर्वेदिक डॉक्टर रुग्णांना त्याच्या आहार आणि अन्य सवयींबाबत सल्ला देताना अनेक गोष्टींचा विचार करीत असतो. त्याने दिलेला आहार विहार विषयक सल्ला न पाळता रुग्ण आजार बरा करण्यासाठी केवळ औषधे घेत राहिला, तर त्याचा आजार कधीच बरा होत नाही. उलट कोणतेही औषध न घेता केवळ आहार विहारांवर योग्य नियंत्रण ठेवल्यामुळे असे रोगी पूर्ण बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. एक मात्र निश्चित, की ही आहारविहार विषयक बंधने आयुष्यभर पाळणे आवश्यक असते. कारण आजार होण्याआधीच्या आयुष्यात असंतुलित आहार नियमितपणे केलेला असतो. त्यामुळे पुढील आयुष्यात तसे न करणेही आयुष्यभर पाळले पाहिजे. नाहीतर आता मी पूर्ण बरा झालो, आता मी पूर्वीप्रमाणेच वागणार असे केल्यास आजारही तुमची पाठ आयुष्यभर सोडणार नाहीत हे निश्चित.
याच कारणासाठी आयुर्वेदाधारित रोग चिकित्सेमध्ये औषध योजनेला अत्यंत गौण स्थान आहे. औषध योजना ही मूळ
चिकित्सा योजनेला पूरक आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. गरज नसताना औषध सेवनामुळे माणसाची रोगप्रतिकारशक्तीही क्षीण होत जात असते. कारण अशा औषध सेवनामुळे विशिष्ट रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यास संधीच मिळत नाही. पण आज औषधाशिवाय रोगाच्या चिकित्सेची कल्पनाही लोक करीत नाहीत. किंबहुना त्यांना तसा विचारही करू दिला जात नाही. वैद्यक व्यवसाय आणि औषध उद्योगाच्या व्यापारीकरणाने तशी त्यांची मानसिकता तयार केलेली आहे. त्यामुळे लोक अधिकात अधिक औषधावलंबी बनत चालले आहेत. हल्ली तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय स्वयं निर्देशित औषध सेवन करण्याचे प्रमाण चिंताजनक होऊ लागले आहे. आयुर्वेदाधारित रोगचिकित्सेमध्ये आहार विहाराधारित चिकित्सा योजनेला अनन्यसाधारण प्राधान्य आहे. खरे तर कोणतेही आयुर्वेदिक औषध हे आधुनिक औषधांना पर्याय म्हणून वापरले जाऊ शकत नाही. आयुर्वेदिक डॉक्टर, शिक्षण तज्ज्ञ व संशोधकांनी तसा प्रयत्न करणेही चुकीचे आहे. केवळ औषध योजना म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सा करणे नव्हे. व्यक्तिपरत्वे रूग्णपूरक औषधेतर आहार विहार म्हणजेच जीवन शैली योजना, हीच खरी आयुर्वेदिक चिकित्सा होय आणि हेच आयुर्वेद चिकित्सेचे बलस्थान आहे. औषध हे त्यात पूरकाचे कार्य करत असते. आयुर्वेदिक डॉक्टर आणि त्याच्याकडे चिकित्सा घेणाऱ्या रुग्णाने हे कधीही विसरता कामा नये.
डॉ. श्रीराम सावरीकर हे एम. डी. (आयु), पीएच. डी. असून, आयुर्वेद प्राध्यापक तसेच गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू, भारत सरकारचे माजी आयुर्वेद सल्लागार आणि भारत सरकारच्या आयुर्वेद फार्माकोपिया समितीचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. त्यांची रसचंडांशु हिन्दी टीका, शारंगधर संहिता इंग्रजी टीका तीन खंड, अर्वाचीन आयुर्वेदायन, आयुर्वेद फाउंडेशन ऑफ हेल्दी लाइफ, इंग्रजी, वैद्यकीय सांख्यिकी शास्त्र हिंदी आदी साहित्य प्रकाशित झाले आहे.
संपर्क: sssavrikar@gmail.com