आजकाल पंचकर्म हा आयुर्वेद चिकित्सेतील परवलीचा शब्द झाला आहे. एकीकडे समाजातील उच्चभ्रू वर्ग हौसेखातर शरीराचे पॅम्परिंग म्हणजे कोडकौतुक करून घेण्याचा एक मार्ग म्हणून पंचकर्म केंद्राची वाट धरत आहे. तर दुसरीकडे सामान्य जनता कधीही बरे होऊ न शकणारा, रोग बरे करणारी एक शेवटची शक्यता म्हणून पंचकर्माकडे पाहात आहे. या दोन्ही प्रकारामध्ये पंचकर्म एक महत्त्वाची आयुर्वेद चिकित्सा म्हणून आपली ओळख व महत्त्व गमावून बसत असल्याचे चित्र दिसत आहे...
सामान्यतः एखाद्या रोगाच्या चिकित्सेसाठी कुठेच काही यश मिळाले नाही की लोकांना आयुर्वेदाची आणि त्यातही पंचकर्माची आठवण होत असते. बहुतेकांना पंचकर्म करणे म्हणजे, स्टीम बाथ घेणे व मसाज करून घेणे असेच वाटत असते. त्याचे कारण पंचकर्म केंद्रांच्या जाहिरातीची पद्धत हे होय. आजकाल पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समधील मसाज पार्लरचीही 'पंचकर्म केंद्र' अशी जाहिरात केली जात असल्याचे आढळते. पर्यटक रिसॉर्ट्सच्या या पंचकर्म केंद्रात पर्यटकांना केवळ स्टीम बाथ व मसाज या सेवा पुरविल्या जात असतात. विदेशी पर्यटकच नव्हे तर अनेक भारतीय पर्यटकही या पंचकर्म केंद्र कम मसाज पार्लरला हौसेने भेट देत असल्याचे दिसून येते.
पंचकर्माच्या या अशा दुष्प्रचारामुळे आयुर्वेदीय पंचकर्माचे चिकित्सा म्हणून महत्त्व नष्ट होऊन ती स्टीम बाथ व मसाज सेवा म्हणून प्रस्थापित होत असल्याचे दिसून येत आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर आयुर्वेदीय पंचकर्माचे खरे स्वरूप समजून घेणे अगत्याचे ठरते.
पंचकर्म या आयुर्वेदातील एका चिकित्सा प्रकारामध्ये पाच प्रकारच्या कर्मांचा समावेश होतो. वमन म्हणजे उलटी करवणे, विरेचन म्हणजे जुलाब देणे, बस्ति म्हणजे एनिमा देणे, नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे आणि रक्तमोक्षण म्हणजे रक्तस्राव घडवणे ही ती पाच कर्मे होत. या पाचपैकी कोणतीही क्रिया निरोगीच काय, पण आजारी माणूसही सहजपणे करून घेण्यास तयार होणार नाही. म्हणूनच यांपैकी कुठल्याच क्रियेला पंचकर्माच्या जाहिरात फलकावर स्थान मिळत नाही. यात लक्षात घ्यावयाची गोष्ट ही, की मसाज किंवा स्टीम बाथ या दोन्ही क्रियांचा पंचकर्मात समावेश नाही. या क्रिया रूग्णाला मुख्य पंचकर्म देण्याचे पूर्व कर्म म्हणजे पूर्वतयारी म्हणून केल्या जातात.
पंचकर्म चिकित्सेमागील मूलभूत आयुर्वेद विचार
पंचकर्म केव्हा आणि कशासाठी करावे, हे समजून घेण्यासाठी यामागील मूलभूत विचार समजून घेणे आवश्यक आहे. चिकित्सेचे नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदान्वये रोगाचे संतर्पण म्हणजे, अतिपोषणाच्या परिणामी होणारे रोग आणि अपतर्पण म्हणजेच पोषणाच्या कमतरतेमुळे होणारे रोग असे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केले जात असते. अपघात वगळता प्रत्येक रोग संतर्पण किंवा अपतर्पण या कारणांच्या परिणामी उत्पन्न होत असतो. पोषणाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगावर घटलेल्या पोषक घटकांची पूर्तता करण्याची चिकित्सा केली जाते. या चिकित्सेला बृंहण म्हणजेच शरीरातील घटकांची वाढ करणारी चिकित्सा असे नाव आहे.
दुसऱ्या प्रकारामध्ये अतिपोषणाच्या परिणामी शरीरामधील घटकांची विकृत वाढ होत असते. अशा विकृत वाढीमुळे होणाऱ्या विकारात शरीरामध्ये वाढलेल्या विकृत घटकांना कमी करणाऱ्या उपायांचा समावेश होतो. उदा. शरीरातील चरबी वाढलेली असेल तर त्यासाठी चरबी कमी करणारे उपाय करणे होय. अशा प्रकारच्या चिकित्सेला लंघन चिकित्सा म्हणजेच शरीरातील विकृत घटक कमी करणारी चिकित्सा म्हटले जाते.
लंघन चिकित्सा
लंघन म्हणजे, शरीरातील वाढलेले घटक कमी करणे. या चिकित्सेचे एकूण दहा प्रकार आहेत. या दहा प्रकारांपैकी शोधन चिकित्सेमध्ये पंचकर्मातील पाचही कर्मांचा समावेश होतो. सामान्यपणे शोधन क्रियेला शरीराची शुद्धी करणे असे संबोधले जाते. उच्चभ्रू वर्गात हल्ली यासाठी 'डिटॉक्स' म्हणजे निर्विषीकरण हा शब्द रूढ होऊ लागला आहे. डिटॉक्स या शब्दामुळे शरीरांत खूप विषारी द्रव्ये साचलेली असतात त्यांना शरीराबाहेर काढून टाकावे लागते, असे काहीतरी समज समाजात पसरू लागले आहेत. वास्तविक अन्नामधील उपयोगी घटक शोषून घेणे व निरूपयोगी घटकांना मल, मूत्र, स्वेद आणि उच्छ्वासाद्वारे शरीराबाहेर टाकणे ही निरोगी शरीरांत सतत चालणारी प्रक्रिया आहे. केवळ रोगाच्या अवस्थेत यामध्ये बिघाड होऊ शकतो. तो बिघाड औषधोपचाराने बरा करता आल्यास या क्रिया पुनश्च सुरू होऊन शरीरास निरूपयोगी घटकांचे नित्य निर्गमन सुरळीत चालू राहते.
मुळात या निरूपयोगी घटकांत विषारी म्हणावे असे काही घटक असत नाहीत. तसे ते असले तर त्यांचे विषारी परिणाम लगेचच दिसू लागतात उदा. फूड पॉयझनिंग अर्थात अन्नविषबाधा. अशा विषबाधेवर तातडीने उपचार करावे लागतात. याउलट नित्याहार सेवनातून शरीरात जाणारे निरूपयोगी घटक शरीरात दीर्घकाल साचून राहिले, तर मात्र ते निरोगी शरीर घटकांना दूषित करतात. या दूषित शरीर घटकांना ढोबळपणे दूषित दोष म्हणजेच विकृत घटक असे म्हटले जाते. या दोषांमुळे विविध विकार निर्माण होऊ लागतात. अशा वेळी त्या विकारांची चिकित्सा करावी लागते. तसेच दूषित झालेल्या शरीर घटकांना दोषमुक्त करावे लागते. ढोबळ मानाने याच चिकित्सेला लंघन चिकित्सा असे म्हटले जाते.
शोधन चिकित्सा हा याच लंघन चिकित्सेचा एक प्रकार आहे. दूषित शरीर घटकांना दोषमुक्त करण्यासाठी प्रत्येक वेळी शोधन करण्याची आवश्यकता नसते. साध्या उपवासापासून ते विशिष्ट औषध सेवनानेही ही दूषित अवस्था दूर केली जाऊ शकते. म्हणूनच सामान्य शारीरिक कुरबुरीसाठी पंचकर्म करण्याची आवश्यकता नसते. रूग्णामध्ये आढळणाऱ्या विशिष्ट लक्षणावरून त्याच्या शरीरातील दूषित घटकांची अवस्था किंवा त्यांच्या दृष्टीच्या प्रमाणाचे अवलोकन करून त्याला कोणत्या प्रकारच्या लंघनाची आवश्यकता आहे, हे ठरवले जाते. ढोबळ मानाने शरीर घटकांची विकृती शरीरातील त्यांच्या नैसर्गिक स्थानावरच सीमित राहणे, ती पुढे शरीरात पसरणे अशा या विकृतीच्या अवस्था असतात. शरीरात पसरू लागल्यावर विकृत दोषांना शरीराबाहेर काढून टाकण्याचा शरीर नैसर्गिक प्रयत्न करीत असते. त्यामुळे मळमळ करणे, कधी कधी उलटी होणे अशी लक्षणे दिसू लागतात. हीच अवस्था शोधन चिकित्सेची आवश्यकता दर्शवत असते.
थोडक्यात, कोणासाठीही अगदी रूग्णासाठीही पंचकर्म म्हणजेच शोधन चिकित्सा वाटेल तेव्हा करावयाची क्रिया नाही. ती रोगाच्या अवस्थेवर अवलंबून असते. लेखाच्या प्रारंभी उल्लेखिल्याप्रमाणे पर्यटक रिसॉर्ट्समधून पंचकर्माच्या नावाखाली बाष्प स्वेद आणि मालिशची सेवा पुरविली जात असते. या सेवा नित्य मद्य सेवी, गर्भावस्था, पित्त वाढलेल्या व्यक्ती, रक्तपित्त म्हणजे हिमोफिलियासारखे रक्तस्रावाचे विकार, अतिसार म्हणजे डायरिया, मधुमेह, स्थौल्य या रोगांनी ग्रस्त व्यक्ती तसेच ज्यांची त्वचा नेहमी कोरडी राहते अशा व्यक्तींसाठी निषिद्ध आहेत. असे असले तरीही रिसॉर्ट्समधून सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्रासपणे स्टीम बाथ आणि मसाज केले जात असते. हे अशा लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
ऋतुक्रमानुसार पंचकर्माचे प्रयोजन
आयुर्वेदिक संस्थांमधून वर्षातील काही विशिष्ट ऋतूंमध्ये वमनादि पंचकर्मे करण्याची शिबिरे भरवण्याचे उपक्रम राबविले जात असतात. या उपक्रमाविषयी थोडेसे जाणून घेऊ या. वात, पित्त व कफ या तीन दोषांनी शरीर बनलेले आहे. या दोषांच्या शरीरातील प्रमाणावर प्रत्येक व्यक्तीचे स्वास्थ्य अवलंबून असते. हे प्रमाण मर्यादित असले म्हणजे व्यक्ती निरोगी राहते. ते मर्यादेबाहेर गेले की ती व्यक्ती आजारी पडते. दोषांच्या प्रमाणातील चढ-उतार ही नित्य व नियमितपणे घडणारी नैसर्गिक घटना आहे. दिवसभरात घडणारे वातावरणातील बदल सकाळचा गारवा, दुपारचे वाढलेले व संध्याकाळी उतरलेले तापमान या सर्वांचा परिणाम दोषांच्या प्रमाणावर होतच असतो. त्याचप्रमाणे वर्षभरात ऋतुमानानुसार वातावरणात विशेषतः तापमानात व आर्द्रतेमध्ये होणाऱ्या बदलांचाही शरीरातील दोषांच्या प्रमाणावर परिणाम होत असतो. आपला आहार आणि जीवनशैली योग्य ठेवली तर दोषांच्या प्रमाणांत होणारे हे नैसर्गिक बदल रोग निर्माण करण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे दोषांच्या प्रमाणांतील या नैसर्गिक बदलासाठी काही औषध घेण्याची आवश्यकता नसते. दोषांचे प्रमाण रोग निर्माणक्षमतेपर्यंत वाढवण्यास आरोग्यासाठी घातक आहार आणि जीवन पद्धती कारणीभूत ठरत असतात. अशा वेळी मात्र या विकृत दोषांना पूर्ववत निरोगी अवस्थेत आणण्यासाठी चिकित्सा द्यावी लागते. ढोबळ मानाने हीच ती लंघन चिकित्सा होय. कारण तिन्ही दोषांना निरोगी प्रमाणात ठेवणे हेच आरोग्य रक्षणाचे मूळ सूत्र आहे.
ऋतुचक्रातील दोषांचे नैसर्गिक चढ उतार
लंघन चिकित्सेच्या विविध प्रकारामध्येच शोधन चिकित्सेचा समावेश होतो. परंतु वाढलेल्या दोषांना कमी करण्यासाठी प्रत्येक वेळी अगदी रोगी अवस्थेतसुद्धा शोधन करण्याची आवश्यकता नसते. ऋतुमानानुसार पंचकर्माची शिबिरे भरवताना आयुर्वेद संहिता ग्रंथातील ऋतुचर्या प्रकरणातील वर्णनाचा आधार घेतला जातो. या पार्श्वभूमीवर ऋतुचर्येमधील शोधन कर्माशी सबंधित संहितोक्त वर्णन आपण संक्षेपाने समजून घेऊ या. ऋतुचक्रानुसार शरीरातील तिन्ही दोषांच्या प्रमाणामध्ये संचय, प्रकोप व प्रशम या क्रमाने चढ उतार होत असतात. दोषांची त्यांच्या नैसर्गिक स्थानी जागच्या जागी वाढ होणे म्हणजे, दोषांचा संचय होणे. वाढलेले दोष आपले नैसर्गिक स्थान सोडून बाहेर पडणे म्हणजे, त्यांचा प्रकोप आणि त्यानंतर प्रकोपित झालेल्या दोषांनी शांत होऊन आपल्या नैसर्गिक स्थानी निरोगी अवस्थेत परतणे म्हणजे त्यांचा प्रशम होय. ऋतुचक्रानुसार दोषांचा संचय, प्रकोप व प्रशम क्रमाने होणे हा निसर्ग नियम आहे. त्यात कधीही बदल होत नाहीत. दोषांच्या या चढ उतारामुळे कोणतेही रोग होत नाहीत. फक्त आरोग्यास बाधक आहार आणि जीवन पद्धती अवलंबिली तर मात्र त्यांचा प्रकोप प्रमाणाबाहेर जाऊन त्यामुळे रोग होण्याची शक्यता बळावते. पण रोग होतोच असे नाही. योग्य वेळी योग्य उपाय केले तर असे काही न होता दोषांचे शमन होऊ शकते. या उपायामध्ये शोधन म्हणजे पंचकर्म करणे हा एक उपाय आहे. पण तो करण्याची नेहमीच आवश्यकता असते असे नाही. दोष जर अतिप्रमाणात वाढून त्यामुळे रोग निर्माण होण्याची शक्यता असेल तर आणि तरच शोधन करणे योग्य ठरते.
आयुर्वेद ग्रंथानुसार पंचकर्म प्रयोजनाची नेमकी अवस्था
सुश्रुत संहितेचे टीकाकार डल्हणाचार्य याबाबत म्हणतात की दोषांच्या वृद्धीचे अल्पदोष वृद्धी, मध्यदोष वृद्धी व बहुदोष म्हणजे अतिवृद्धी असे तीन प्रकार आहेत. प्रकोप हा शब्द प्रकर्षाने म्हणजेच अतिप्रमाणात झालेली वृद्धी म्हणजेच बहुदोष अवस्था दर्शवतो. अल्प दोषासाठी उपवास, मध्य दोषासाठी औषध सेवन आणि बहुदोषासाठी शोधन म्हणजेच पंचकर्म चिकित्सा करावी लागते. या संबंधांत चरक संहितेचे टीकाकार चक्रपाणि म्हणतात, की बहुदोष अवस्थेमध्ये संशोधन म्हणजे प्रस्तुत लेखासंदर्भातील पंचकर्म आणि अल्पदोषामध्ये संशमन म्हणजे उपवास किंवा औषध सेवन करावे. वाग्भटकृत अष्टांग हृदयाचे टीकाकार हेमाद्रिंच्या मते, ऋतुक्रमामध्ये दोषांच्या होणाऱ्या प्रकोपाचे म्हणजेच वृद्धीचे चयपूर्वक प्रकोप आणि अचयपूर्वक प्रकोप असे दोन प्रकार आहेत. यापैकी दोष शरीरात साठत जाऊन चयपूर्वक प्रकोप होत असतो. या अवस्थेमध्ये शोधन, तर अचयपूर्वक म्हणजे, वातावरणातील होणाऱ्या बदलाच्या परिणामी साठवणूक न होताच दोषांच्या होणाऱ्या प्रकोपामध्ये शमन चिकित्सा करावी लागते.
एखादी व्यक्ती जेव्हा अपथ्य सेवन करते, म्हणजे आरोग्यास घातक ठरणाऱ्या आहार व जीवन पद्धतीचा अवलंब करते, तेव्हा चयपूर्वक प्रकोपाची अवस्था निर्माण होत असते. पथ्य सेवन म्हणजेच योग्य आरोग्यदायी आहार व जीवनपद्धती अवलंबिल्यानंतरही ऋतुक्रमानुसार अचयपूर्वक प्रकोप होत असतो. चरकाचार्यांनी अचयपूर्वक प्रकोपाची उदाहरणे उधृत केली आहेत. भूबाष्प म्हणजे जमिनीतील पाण्याची वाफ, जी तिन्ही दोषांच्या प्रकोपास कारण ठरते, मेघनिस्यन्द म्हणजे पावसाचे पाणी कफाचा प्रकोप करणारे आहे आणि वर्षाजलाची आम्लता पित्त आणि कफाचा प्रकोप करणारी आहे. हे तिन्ही प्रकार दोषांचा साठा न होता, त्यांचा सरळ प्रकोप करणारे आहेत. अशा प्रकारच्या प्रकोपासाठी शोधन म्हणजे पंचकर्म करण्याची आवश्यकता नसते. आवश्यकतेनुसार उपवास वा औषध सेवनानेही या अचयपूर्वक प्रकोपित दोषांचे शमन होत असते. हेमाद्रि पुढे म्हणतात, की निरोगी व्यक्तीमध्ये असंचित दोष प्रकोप अवस्थेमध्ये, आवश्यकता नसताना शोधन करणे नेहमीच वर्ज्य असते. अशा निरोगी म्हणजेच स्वस्थ व्यक्तीचे शोधन केल्यामुळे दोषांचा उद्रेक होऊन त्याचे सर्पविषबाधेसमान घोर दुष्परिणाम होत असतात. चयपूर्वक म्हणजे शरीरात दोष साठून त्यांचा प्रकोप होणे, हे रोगावस्थेचे लक्षण आहे. चयपूर्वक प्रकोपामध्येही बहुदोष म्हणजेच दोषांची वाढ अतिप्रमाणात असेल तरच शोधन म्हणजेच पंचकर्माचा उपयोग योग्य ठरतो. अन्यथा अल्प व मध्य दोष वृद्धीसाठी उपवास व औषध सेवनाने कार्यभाग साध्य होतो.
उपरोक्त वर्णनावरून पंचकर्म ही रोगाच्या विशिष्ट अवस्थेमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली करावयाची आयुर्वेद चिकित्सा आहे. तसेच ती रोगाची चिकित्सा करतानाही प्रत्येक वेळी करावी लागतेच असे नाही. किंबहुना ती फारच कमी वेळा करावी लागते. हे स्पष्ट होते. पंचकर्माची तुलना शस्त्रक्रियेशी करता येईल. निष्णात शल्यचिकित्सक अगदीच अनिवार्य असेल तरच शस्त्रक्रिया करतो. शस्त्रक्रिया टाळण्याकडेच त्याचा अधिक कल असतो. आयुर्वेद तज्ज्ञाची भूमिकाही अशीच असली पाहिजे. त्याने पंचकर्म चिकित्सेचा वापर अनिवार्य असेल तरच केला पाहिजे. रोगावस्थेमधील पंचकर्म चिकित्सेचा वापर जर इतका काळजीपूर्वक करावयाचा असेल, तर निरोगी व्यक्तीसाठी पंचकर्म करण्याचे प्रयोजनच राहत नाही.
केवळ पंचकर्मातील पाच क्रियाच नव्हे, त्याच्या पूर्वकर्मातील स्नेहन म्हणजेच मसाज आणि स्वेदन म्हणजे स्टीम बाथ या क्रियाही निरोगी व्यक्तीसाठी करावयाच्या नाहीत. याही क्रियांचे विशिष्ट प्रयोजन असते. काही अवस्थांमध्ये तर या क्रियाही निषिद्ध आहेत. हे ध्यानात घ्यायला हवे. पंचकर्म ही आयुर्वेद चिकित्सा पद्धतीतील एक अत्यंत महत्त्वाची शोधन चिकित्सा आहे, हे निःसंशय पण त्याचा नको तेव्हा आणि नको तिथे विशेषतः निरोगी व्यक्तीमधील वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. या विफलतेचे समर्पक वर्णन योगासबंधातील ज्ञानेश्वर महाराजांच्या एका ओवीने करता येईल:
"पाहे पां लोहाचे चणे। जै बोचरियां पडती खाणे। तै पोट भरणे कीं प्राणें। शुद्धी म्हणो।"
लेखक: डॉ. श्रीराम सावरीकर (संपर्क: sssavrikar@gmail.com)
साभार: समतावादी मुक्त संवाद पत्रिका (सप्टेंबर २०२६)