बाळ जन्माला आले की विविध रोगप्रतिबंधक लशी बरोबरच त्याला सुवर्ण प्राशन करविण्याची पद्धत आजकाल रूढ होऊ लागली आहे. हे आयुर्वेदाच्या ब्रँडिंगचे यश म्हणायचे, की आई-बापांची त्यांच्या अपत्याप्रतीची भावनिक अगतिकता म्हणायचे हे कळणे अवघड आहे. पूर्वीच्या काळी घराघरांतून बाळाच्या जन्मानंतर इतर अनेक संस्काराबरोबरच सुवर्ण प्राशन संस्कारही केला जात असे. पण आज इतर संस्कार करो ना करो सुवर्ण प्राशन मात्र आवर्जून केले जात आहे. त्याला अगदी तथाकथित उच्चशिक्षित आणि उच्चभ्रूही अपवाद नाहीत. कारण आता बाळाचे सुवर्ण प्राशन हा श्रद्धा आणि आस्थेचा विषय झाला आहे. ती मातापित्यांची भावनिक अगतिकता बनली आहे. ते केले नाही तर आई-बाप आपल्या बाळाच्या आरोग्याविषयी व भविष्याविषयी निष्काळजी आहेत, असा विचार रूढ होऊ लागला आहे. असे असले तरी ही आस्था किंवा भावनिक गरज पूर्ण करताना मातापित्यांनी या सुवर्ण प्राशनासंबंधात काही मूलभूत गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे...
आजकाल भारतातील अनेक राज्यांतून कित्येक आयुर्वेद महाविद्यालये सुवर्ण प्राशनाचा सढळ प्रचार व प्रसार करीत असल्याचे दिसून येते. काही वर्षापूर्वी सुवर्ण प्राशनाची मोठमोठी शिबिरे भरल्याचे मी पाहिले आहे. या शिबिरांमधून आई-बाप आपल्या काही महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन त्याला सुवर्ण प्राशन करविण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दीमध्ये रांगा लावून उभे असलेले आपल्यातील अनेकांनी पाहिले असेल. या गर्दीमध्ये गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित अशा सर्वांचा समावेशही आपल्या निदर्शनास आलाच असेल. त्या काळात सुवर्ण प्राशन फारसे प्रचलित झालेले नव्हते. त्यामुळे ते करणारे आयुर्वेदिक डॉक्टर्सही फारसे उपलब्ध नसत. म्हणूनच सुवर्ण प्राशनाच्या शिबिरांना लोक खूप गर्दी करत असत. या शिबिरांनी आयुर्वेद व्यावसायिकांना एक नवे व्यावसायिक दालनच उघडून दिले असे म्हणावयास हरकत नाही. मात्र, आता आपल्या बाळाला सोने पाजण्यासाठी पालकांना शिबिरांची वाट पाहण्याची आवश्यकता राहिलेली नाही. हे पाहून आयुर्वेद प्रेमी मनोमन आनंदी होत असले तरी आयुर्वेदाला छद्म विज्ञान ठरवणाऱ्या तथाकथित विद्वानांच्या हाती या निमित्ताने एक कोलित मिळाले आहे, हे मात्र निश्चित. या पार्श्वभूमीवर सुवर्ण प्राशनाची वैज्ञानिकता तपासणे अत्यावश्यक आहे.
सुवर्ण प्राशनाची आयुर्वेदोक्त पद्धत
सुवर्ण प्राशन या शब्दाचा उल्लेख काश्यप संहिता या इ.स. पूर्व सहाव्या शतकातील आयुर्वेद संहिता ग्रंथात मिळतो. काश्यप संहितोक्त सुवर्ण प्राशन विधीमध्ये कसोटी पाषाणावर (टचस्टोन) पाणी टाकून त्याबरोबर सोने घासून त्यात मध व तूप मिसळून चाटण तयार करून बाळाला ते चाटवले जाते. कसोटी पाषाणावर सोने घासले की त्यावर सोन्याच्या अतिसूक्ष्म कणांची एक सोनेरी रेघ उमटत असते. या रेघेतील अति अत्यल्प प्रमाणातील सोन्याचे अतिसूक्ष्म कण मिसळलेल्या पाण्यामध्ये तूप व मध मिसळून त्याचे चाटण बाळाला केले जात असे. सुश्रुत संहितेतील उल्लेखाप्रमाणे असे चाटण करणे हा एक जातकर्म संस्कार आहे. या संस्कारामध्ये बाळाच्या जन्मानंतर त्याची नाळ कापल्यानंतर लगेचच त्याचे मुख स्वच्छ करून त्याला चाटण केले जाते. यात पहिल्या प्रहरात म्हणजे बाळाच्या जन्मानंतर साधारण तीन तासाच्या आत आईचे दूध पाजण्याआधी असे चाटण करणे आवश्यक आहे.
सुश्रुतोक्त सुवर्ण प्राशनामध्ये मध आणि तुपाच्या मिश्रणामध्ये सुवर्ण चूर्ण मिसळून अनामिका बोटाने ते मिश्रण चाटवायचे आहे. हे अधिक सयुक्तिक वाटते, कारण या प्रकारामध्ये सोन्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. बाळाच्या जन्मानंतर सुवर्ण प्राशनाचा पुढील काल ते मूल जेव्हा अन्न प्राशन सुरू करते तेव्हा सामान्यतः मूल एक वर्षाचे झाल्यानंतर सुरू होतो. बाळाच्या जन्मानंतर एक वर्षापर्यंत त्याला शिशु आणि १ ते १२ वर्षापर्यंत कुमार म्हटले जाते. शिशु काल उलटल्यानंतर म्हणजे त्याने पूर्णपणे घन अन्न सेवन करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याला सुवर्ण प्राशन करवण्याचा योग्य काल होय.
वाग्भटांनी पुष्य नक्षत्रोदयावेळी सारस्वत घृत हे सुवर्ण चूर्णयुक्त औषधी तूप कुमार वयाच्या मुलाला एक वर्षभर नित्य देण्यास सांगितले आहे. सारस्वत घृताऐवजी वेखंड आणि सुवर्ण चूर्ण मिसळलेले तूप व मधाचे मिश्रणही चाटवता येते. याच प्रकारे तूप व मधाच्या मिश्रणात इतर काही वनस्पतींची चूर्णे, सुवर्ण चूर्णासह मिसळून चाटवण्यासाठी वाग्भट व सुश्रुतांनी सुचवली आहेत. ही सर्व औषधे कुमार वयाच्या मुलाला वर्षभर नित्य द्यावयाची आहेत. कधीतरी एक दिवस देऊन त्याचा काही उपयोग व्हावयाचा नाही. अशा प्रकारच्या सुवर्ण प्राशनामुळे बाळाच्या बुद्धी, पचन आणि देहबलाचे वर्धन होते. तसेच तो मेधावी म्हणजे बुद्धिमान होतो, त्याची रोगप्रतिबंधक क्षमता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते अशी या सुवर्ण प्राशनाची महत्ता आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये वर्णिली आहे.
सुवर्ण प्राशन औषधातील सोन्याचे प्रमाण
या विधीमध्ये सुवर्ण चूर्णाच्या प्रमाणाबाबत अत्यंत संभ्रमाची स्थिती आहे. पाषाणावर सोने घासून घेण्याच्या पद्धतीमध्ये सोन्याचे कण किती प्रमाणात मिसळतात हे कळत नाही. सुश्रुताच्या डल्हणादि टीकाकारांनी एक गुंजा म्हणजे १२५ मि.ग्रॅ. सुवर्ण चूर्ण तूप व मधामध्ये मिसळून ते बाळाला चाटवावे असे म्हटले आहे. हे सुवर्णाचे प्रमाण खूप जास्त आहे. कारण कसोटी पाषाणावर सोने घासून घेण्याच्या पद्धतीमध्ये औषधात सोन्याचे अतिसूक्ष्म कण अति अत्यल्प प्रमाणात म्हणजे अगदी नॅनोग्रॅम्समध्ये मिसळण्याची शक्यता आहे. या नॅनोग्रॅम्सच्या तुलनेत सुश्रुत १२५ मि.ग्रॅ. सोन्याचे चूर्ण मिसळण्याचा सल्ला देणे शक्य नाही.
सोन्याचे प्रमाण इतके अधिक नसण्याच्या शक्यतेचे आणखी एक कारण म्हणजे, पुढे धातू भस्मांचा वापर प्रचलित झाल्यानंतर सुवर्ण भस्माची वयस्क व्यक्तीची मात्राही १ ते २ यव म्हणजे १५ ते ३० मि.ग्रॅ प्रचलित झाली. हे इथे लक्षात घेतले पाहिजे. अद्यतन वैज्ञानिक माहितीनुसार आयुर्वेद ग्रंथोक्त सुवर्ण प्राशन मिश्रणामध्ये सोन्याचे अतिसूक्ष्म कण आज ज्ञात असलेल्या कोलायडल गोल्ड स्वरूपांशी समकक्ष उपस्थित असल्याचे सकृद्दर्शनी वाटते. त्यामुळेच हे सोन्याचे प्रमाण १००-१२५ मि.ग्रॅ. असणे शक्य नाही.
सुवर्ण प्राशनासाठी औषध तयार करण्याची हल्लीची पद्धत
आयुर्वेद ग्रंथातील उपरोक्त वर्णनाधारेच आजकाल सुवर्ण प्राशन केले जात आहे. परंतु यामध्ये ग्रंथोक्त वर्णनाप्रमाणे काहीही केले जात नाही. हल्ली सुवर्ण भस्म तूप व मधाच्या मिश्रणात मिसळून वाटेल तितक्या प्रमाणात व वाटेल त्या पद्धतीने, वाटेल तेव्हा बालकाला दिले जात आहे. कालानुसार पद्धतीमध्ये बदल घडणे यात काही चुकीचे नाही. पण असा बदल करताना संबंधित क्रियेचा हेतूच पराभूत होत असेल, तर तो बदल काय कामाचा?
सुवर्ण प्राशन औषधात एकूण तीन घटक आहेत: सुवर्ण, गाईचे तूप व मध. हल्ली सुवर्ण हे सुवर्ण भस्म स्वरूपात वापरले जाते. आयुर्वेदोक्त सुवर्ण प्राशन विधीची सुरुवात झाली, त्या प्राचीन काळात सुवर्ण भस्म बनवण्याची पद्धतच ज्ञात नव्हती. हल्ली १ ते १.७५ ग्रॅम तूप व मधाच्या मिश्रणात १ ग्रॅम ते २.५ ग्रॅम सुवर्ण भस्म मिसळून सुवर्ण प्राशनाचे औषध बनवले जात असते. काही ठिकाणी एक किलो तूप मधाच्या मिश्रणात दहा ग्रॅम सुवर्ण भस्म मिसळतात, असेही समजते. पण यात कोणत्या प्रकारचे सुवर्ण भस्म वापरले जाते, हे ज्ञात नाही. सुवर्ण भस्मातील सोन्याचे प्रमाण २० ते ९० टक्क्यांपर्यंत तयार करण्याच्या पद्धतीनुसार बदलत असते. सुवर्ण भस्म बनवण्याच्या यातील एका पद्धतीत अर्सेनिक आणि शिशाचाही वापर केला जातो. त्यामुळे असे सुवर्ण भस्म सुवर्ण प्राशनासाठी वापरता कामा नये.
पण यापैकी कोणते सुवर्ण भस्म वापरावे आणि त्याचे तूप व मधाच्या मिश्रणात किती प्रमाण असावे याबाबत आयुर्वेद तज्ज्ञांत एकमत नाही. या औषधातील अन्य महत्त्वाचे घटक म्हणजे तूप आणि मध. या दोघांचे परस्पर प्रमाणही निश्चित नाही. ते सम असू नये, इतकाच नियम आहे. त्यातच बाजारात मिळणारे तूप आणि मध या दोन्ही पदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशयाची स्थिती आहे.
एकजिनसीपणाचा अभाव
सुवर्ण प्राशनासाठी औषध तयार करण्याची पद्धत व तयार झालेले औषध साठवून ते बाळाला प्रत्यक्ष देण्याची वेळ यांचा विचार करता, या औषधी मिश्रणाच्या एकजिनसीपणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. मुळात मध आणि तूप मिसळून त्यापासून एकजीव मिश्रण तयार होऊ शकत नाही. हे दोन्ही मिसळल्यानंतर त्यापासून मध व तूप यांची स्वतंत्र उपस्थिती दिसणारे एक चिकट सस्पेन्शन तयार होते, जे वेळ उलटेल तसे वेगवेगळे होत जाते. याचे कारण मध हे पाण्यामध्ये विरघळलेल्या साखरेच्या स्वरूपाचे तर तूप हे शंभर टक्के चरबीयुक्त असते.
यानंतर प्रश्न येतो तो सोन्याचे भस्म मध व तुपात मिसळण्याचा. सोने हे ॲक्वा रेजिया या नायट्रिक ॲसिड व हायड्रोक्लोरिक ॲसिड यांच्या मिश्रणाव्यतिरिक्त इतर कशातही विरघळत नाही. त्यामुळे तूप आणि मधाच्या मिश्रणात सुवर्ण भस्म विरघळून त्यापासून होमोजिनस म्हणजे एकजिनसी मिश्रण तयार होणे दुरापास्त आहे. सुवर्ण प्राशन मिश्रण एकजीव राहावे म्हणून काही लोक त्यामध्ये कृत्रिम इमल्सिफायर मिसळत असतात. परंतु इमल्सिफायर मिसळूनही मिश्रणाचा एकजिनसीपणा आवश्यक तितका काळ टिकून राहात नाही. त्यामुळे अशा आधीच बनवून ठेवलेल्या १ ते २ किलो साठ्यातील तीन-चार थेंब ड्रॉपरच्या सहाय्याने बाळाच्या तोंडात टाकले जातात. या थेंबातून बाळाला किती सुवर्ण, किती तूप आणि किती मध मिळत असेल हा मोठा प्रश्न आहे.
वास्तविक आयुर्वेदोक्त बहुसंख्य औषध प्रदान पद्धतीप्रमाणे सुवर्ण प्राशन ही एक व्यक्तिकेंद्रित औषध प्रदान पद्धती आहे. या पद्धतीमध्ये आवश्यक असेल त्याचवेळी व संबंधित बालकाला लागेल तेवढेच औषध ताजे तयार करून देणे आवश्यक असते. बाळाला सुवर्ण प्राशन देताना एका चमच्यामध्ये आवश्यक तेवढेच तूप, मध आणि सुवर्ण मिसळून ते ताजे चाटण बाळाला दिले पाहिजे. घाऊक प्रमाणात साठवून ठेवलेल्या बाटलीतून ड्रॉपरने थेंब टाकणे योग्य नाही.
सुवर्ण प्राशनाचा योग्य काल
सुवर्ण प्राशन नेमके केव्हा व कसे करावे, या बाबतीतही संहिता ग्रंथांनुसार कुमार वयात एक वर्षभर नित्य देण्यास सांगितले आहे. पण हल्ली मूल काही महिन्यांचे झाल्यावर कधीतरी एकदाच किंवा महिन्यातून एकदा सुवर्ण प्राशन करवून आणले जाते. असे केव्हातरी मनात येईल तेव्हा सोने चाटवून बाळाची बुद्धी आणि शरीर बल वाढेल का? सुवर्ण प्राशनाचा असा अभ्यास सम समीक्षा (Peer-reviewed) संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाल्याचे आढळत नाही.
सुवर्ण प्राशनाची वैज्ञानिक समीक्षा
आयुर्वेदामध्ये उल्लेखित सुवर्ण प्राशन हे कोलायडल गोल्ड (Colloidal Gold) च्या समकक्ष उदाहरण दिसते. द्रव्याचे कोलायडल स्वरूप म्हणजे एक असे मिश्रण ज्यामध्ये द्रव्याचे अतिसूक्ष्म कण द्रवामध्ये न विरघळता तरंगत राहतात (नॅनोमीटर आकारात). आधुनिक वैद्यक शास्त्रात गोल्ड नॅनोपार्टिकल्सवर कॅन्सर चिकित्सा, फोटोथर्मल थेरपी आणि इम्युनोथेरपीसाठी संशोधन चालू आहे. परंतु बुद्धिवर्धन व स्मरणशक्तीच्या संदर्भात सखोल क्लिनिकल पुरावे अजून आवश्यक आहेत.
त्यामुळे पालकांनी सुवर्ण प्राशन करवताना त्यामागील शास्त्रीय पद्धती, घटकांची शुद्धता आणि योग्य विधी समजून घेणे गरजेचे आहे.
लेखक: डॉ. श्रीराम सावरीकर (संपर्क: sssavrikar@gmail.com)
साभार: समतावादी मुक्त संवाद पत्रिका (ऑगस्ट २०२६)